
मुंबईः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा मोसमी पाऊस सक्रीय झाला असून आज आणि उद्या (२८ व २९ ऑगस्ट) कोकण, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांना आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी करत अतिवृष्टीचा शक्यता वर्तवली आहे.
राज्यात २८ ते ३१ ऑगस्ट या काळात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार त काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्या लगत कमी दाबाचे ठळक क्षेत्र सक्रीय झाले असून मोसमी पावसाचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेरपासून दामोह, पेंद्रा रोड ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय सक्रीय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे.
आज (२८ ऑगस्ट) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा व व पुणे घाटमाथा, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) या जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
तर पालघर ठाणे, मुंबई, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर (अहमदनगर), पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

उद्या २९ ऑगस्ट रोजीही पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर (अहमदनगर), छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड अकोला, अमरावती जिल्ह्यांत तर उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
३० आणी ३१ ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर सातारा व पुणे घाटमाथा या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात या काळात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.
