बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक; दादा गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर तुफान दगडफेक, गाडीचीही जाळपोळ


बीडः मराठा आरक्षण प्रश्नावरून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत असतानाच आज बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक आणि हिंसक झालेले पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर आज तुफान दगडफेक करण्यात आली. तसेच सोळंके यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीचीही जाळपोळ करण्यात आली. या राड्यात आ. सोळंके आणि त्यांचे कुटुंबीय सुखरुप असल्याची माहिती आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज माजलगाव आणि वडवणी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. या दोन तालुक्यातील सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले होते. हा बंद सुरू झालेला असतानाच काही आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत त्यांच्या घरावर तुफान दगडफेक केल्याचा आरोप आहे. आंदोलकांनी आ. सोळंके यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीचीही जाळपोळ केली.

आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये आ. सोळंके यांचे घर आणि गाड्यंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या दगडफेक आणि जाळपोळीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकारावर आ. सोळंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी माजलगावमधील घरातच आहे. काही आंदोलक माझ्या घरी आले होते. त्यांच्याशी बोलण्याची मला संधीच मिळाली नाही. कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. अचानक त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यामध्ये माझ्या घराचे नुकसान झाले. घराबाहेर असलेल्या गाडीचीही जाळपोळ करण्यात आली, असे आ. सोळंके म्हणाले.

मीही मराठा समाजाचा आमदार आहे. माझाही मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. कोणीतरी अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर मराठा समाजाने विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन आ. सोळंके यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!