
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विजय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाळूज येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात गंभीर स्वरुपाच्या प्रशासकीय आणि आर्थिक अनियमितता आढळून आल्या असून महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने सरकारी तिजोरीतून तब्बल ९५ लाख ६० हजार ३६३ रुपयाच्या रकमेवर डल्ला मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आता दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचेही ‘कोहिनूर’ होणार की काय? अशी शंका घेण्यात येऊ लागली आहे.
विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव विजयकुमार राऊत यांनी इन्स्ट्रूमेंटेशनमध्ये बी.ई. असून आपल्याच संस्थेच्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात मुख्य लिपीक पदावर नियुक्ती करून घेऊन कवडीचेही काम न करता सरकारी तिजोरीतून वेतन लाटत असल्याचा गौप्यस्फोट न्यूजटाऊनने २६ ऑगस्ट रोजी केल्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आणि संस्थाचालक सरकारच्या डोळ्यात धुळफेक करून कशी हडेलहप्पी करतात, याबाबतची रंगतदार चर्चा सुरू झाली असतानाच या महाविद्यालयाचा नवीन कारनामा न्यूजटाऊनच्या हाती आला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागीय सहसंचालक कार्यालयातील अनुदान निर्धारण पथकाने २० ऑगस्ट रोजी दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाला भेट देऊन या महाविद्यालयाला राज्य सरकारकडून अदा करण्यात आलेल्या वेतन अनुदानाचा कसा विनियोग करण्यात आला, याची झाडाझडती घेतली असता अत्यंत गंभीर स्वरुपाच्या प्रशासकीय आणि आर्थिक अनियमितता आढळून आल्या आहेत.
दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे यापूर्वी सन २०१६-१७ मध्ये अनुदान निर्धारण करण्यात आले होते. हा अनुदान निर्धारण अहवाल आणि महाविद्यालयाचे सनदी लेखापालांनी सन २०१७-१८ चे केलेले लेखापरीक्षण या दोन्ही बाबींचे अवलोकन केले असता या महाविद्यालयाने तब्बल ४३ लाख २३ हजार ८३ रुपये वेतन अनुदानाची रक्कम घश्यात घातल्याचे उघडकीस आले आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने शिष्यवृत्तीतून शैक्षणिक शुल्कापोटी प्राप्त झालेले २७ लाख ६५ हजार ८१५ रुपयेही गडप करून टाकले आहेत.
एवढेच नव्हे तर दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने शैक्षणिक शुल्कापोटी प्राप्त झालेले १२ लाख ५८ हजार ३२० रुपये, व्यवस्थापन वेतनापोटी प्राप्त झालेले ११ लाख ८५ हजार १९२ रुपये आणि बँकेत जमा रकमेवरील व्याजापोटी प्राप्त झालेले २७ हजार ९५३ रुपये अशी तब्बल ९५ लाख ६० हजार ३६३ रुपये रक्कम घश्यात घातल्याची गंभीर बाब या अनुदान निर्धारणात उघडकीस आली असून आता ही रक्कम चलनाद्वारे शासन खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे महाविद्यालय व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहे.

हडेलहप्पीसाठी अशी वापरली ‘ट्रिक’
नियमानुसार कोणत्याही अशासकीय अनुदानित महाविद्यालयाला विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेले शैक्षणिक शुल्क, प्रवेश शुल्क, शिष्यवृत्तीच्या रकमेतून प्राप्त झालेले शैक्षणिक शुल्क वेतन अनुदान खात्यातच जमा करणे अनिवार्य आहे. परंतु दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने तसे न करता हडेलहप्पीसाठी या रकमा स्वतंत्र बँक खात्यात जमा केल्या. या महाविद्यालयाची बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॉसमॉस बँक अशी तीन स्वतंत्र खाती आहे. पैकी बँक ऑफ महाराष्ट्रात वेतन अनुदान खाते आहे. नियमानुसार या सर्व रकमा याच बँक खात्यात जमा करणे अनिवार्य होते, परंतु महाविद्यालय व्यवस्थापनाने तसे केलेच नाही. यातून महाविद्यालय व्यवस्थापनाचा अंतस्थ हेतू स्वच्छ नसल्याचेच स्पष्ट होत आहे.
हेही वाचाः वादग्रस्त कोहिनूर महाविद्यालयावर प्रशासक नेमणार, विद्यापीठ पाठवणार राज्य सरकारकडे प्रस्ताव
आणखी मोठ्या घोटाळ्याचा होणार पर्दाफाश?
या तिन्ही बँक खात्याची झाडाझडती घेण्यास विभागीय सहसंचालक कार्यालयाने सुरू केली असून सन २०१७-१८ ते २०२४-२५ या कालावधीतील तिन्ही बँक खात्याचे परिपूर्ण बँक स्टेटमेंट सादर करण्याचे फर्मान अनुदान निर्धारण पथकाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सोडले आहे. या तिन्ही बँक खात्याच्या झाडाझडतीतून आणखी मोठा आर्थिक घोटाळा आणि गंभीर स्वरुपाच्या अनियमितता उघडकीस येण्याची शक्यता आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या शुल्काचा हिशेब सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले असून त्यातूनही महाविद्यालय व्यवस्थापनाची हडेलहप्पी समोर येण्याची शक्यता आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य अनुदान निधी वितरणात आर्थिक अनियमितता करत असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.

