
परभणीः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमधील एकापाठोपाठ एक मंत्री वादग्रस्त वक्तव्ये करून सरकारची ‘शोभा’ वाढवत चालले असतानाच आता त्यात जिंतूरच्या भाजप आमदार आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची पडली आहे. परभणी जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मेघना बोर्डीकर यांनी एका ग्रामसेवकाला थेट कानखाली मारण्याची आणि आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकण्याची धमकी दिली आहे. सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचे टार्गेट पूर्ण न केल्यामुळे बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला ही धमकी दिल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोरी सर्कलमधील १७ ग्रामपंचायतींतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा दोन अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वितरण तथा लाभार्थी गृहप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा माथुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, गटविकास अधिकारी सुभाष मानकर इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मोठ्या संख्येने आणण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात या कार्यक्रमाला लाभार्थ्यांची मोठी संख्या जमलीच नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या मेघना बोर्डीकर चिडल्या आणि त्यांनी बोरी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला भरसभेत ‘तुझ्या कानाखाली वाजवीन, तुला आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकीन,’ अशी धमकी दिली.
मेघना बोर्डीकर यांनी भरसभेत ग्रामसेवकाला धमकी देत केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात बोलताना त्या या कार्यक्रमासाठी घरकुल योजनेचे किती लाभार्थी आणलेत याची विचारणा ग्रामसेवकाला करत आहेत. त्यावर ग्रामसेवकाने ‘भरपूर आणलेत’ असे उत्तर दिल्यामुळे मेघना बोर्डीकरांचा तोल सुटला आणि त्या ग्रामसेवकावर भडकल्या. त्यांनी ग्रामसेवकाला दिलेली धमकी आणि केलेली दमदाटी त्यांच्याच शब्दात…
‘किती भरपूर? असे चालणार नाही बघ… जादा बोलायचे काम नाही बघ.. मेघना बोर्डीकरचा शब्द आहे… कानाखालीच घालीन आता..बिल्कुल चालणार नाहीत असे नखरे…पगार कोण देतेय? आं? असली चमचेगिरी बिल्कुल चालणार नाही…आत्ताच्या आत्ता बडतर्फ करुन टाकीन सांगतेय…चमचेगिरी कोणाची करायची नाही याद राख… काय इथं कारभार करतोय मला माहिती नाही का? मुद्दाम मी इथं आज सीईओ मॅडमना बोलायवलंय….नोकरी नाही करायची ना सोडून दे नोकरी….’ अशी दमदाटी करत त्यांनी थेट धमकी दिल्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.
‘ फडणवीस साहेब, काय सज्जन मंत्री शोधलेत आपण!’
फडणवीस सरकारमधील राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भरसभेत ग्रामसेवकाला धमकी दिल्याचा व्हिडीओ शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर निशाणा साधला असून ‘फडणवीस साहेब, काय सज्जन मंत्री शोधलेत आपण, यांना आवरा,’ अशी खोचक टीका केली आहे.
‘सभागृहामध्ये रम्मी खेळणारे… पैशांच्या बॅगा भरणारे…डान्सबार चालवणारे… आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे… यामध्ये भर पडली ती थेट अधिकाऱ्याच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची… सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचे टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?’ देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची इज्जत जातेच, पण यापेक्षा महाराष्ट्राची बेअब्रु होतेय, याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा’ असा टोला आ. रोहित पवार यांनी लगावला आहे. पहा व्हिडीओ-
