राहुल गांधी यांची खासदारकी तडकाफडकी रद्द, लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयामुळे देशाच्या राजकारणात खळबळ!


नवी दिल्लीः ‘भारत जोडो’ यात्रा काढून देशभर आणि अदानी प्रकरणी संसदेत भाजपची पाचावर धारण बसवणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. मोदी या आडनावाविषयी टिप्पणी केल्याप्रकरणी सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली आहे. लोकसभा अध्यक्षांची ही कारवाई काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणी मोदी सरकारवर जोरदार हल्लबोल चढवला होता. अदानी प्रकरणी हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणात संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, यासाठी त्यांनी संसदेत आग्रही भूमिका मांडली होती.

राहुल गांधींच्या आक्रमक पवित्र्यामुळे मोदी सरकारची चांगलीच अडचण झाली होती. आता सुरत न्यायालयाचा निकाल आल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करत त्यांची खासदारकीच रद्द केली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या या कारवाईमुळे देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

मोदी आडनावाविषयी टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात सूरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. सूरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी राहुल गांधी यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यासाठी राहुल गांधी यांना जामीनही मंजूर करण्यात आला होता. लोकसभा अध्यक्षांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहताच सूरत न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे राहुल गांधी यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

आता निवडणूक आयोगही कारवाई करणार?

राहुल गांधी यांच्यावर आता निवडणूक आयोगाकडूनही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे राहुल गांधी यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घातली जाऊ शकते. तसेच राहुल गांधी यांना त्यांचे सरकारी निवासस्थानही सोडावे लागेल. नवी दिल्ली येथील १२, तुघलक रोड या बंगल्यात राहुल गांधी यांचे वास्तव्य आहे. हा बंगला राहुल गांधी यांना सोडावा लागू शकतो. लोकसभा सचिवालयाच्या निर्णयावर होणारी टिकेची झोड पाहता निवडणूक आयोगही तातडीने कारवाई करून या वादात उडी घेते की उच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची वाट पहाते, हे पहावे लागणार आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

 गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना मोदी या आडनावावरून टिप्पणी केली होती. सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? मग ते ललित मोदी असो, नीरव मोदी वा नरेंद्र मोदी, असे राहुल गांधी म्हणाले होते.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात सूरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल देताना सूरत जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली होती.

आम्ही लढत राहू- खरगेः राहुल गांधी सत्य मांडत होते आणि मांडत राहणार. हे त्यांना पचत नाही. त्यामुळे राहुल गांधींवर अपात्रतेची कारवाई केल्याने समस्या संपतील असे त्यांना वाटत असेल, पण त्यांच्या समस्या संपणार नाहीत. आम्ही जेपीसीची मागणी करत राहू. लढत राहू. लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जेलमध्ये जावे लागले तरी आम्ही तयार आहोत, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

मोदींच्या निर्देशांनुसारच कारवाई

न्यायालयाच्या निर्णयानंतर २४ तासांत कारवाई केल्यामुळे आश्चर्यचकित झालो आहे. हे आपल्या लोकशाहीसाठी अशुभ संकेत आहेत, असे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. हे सर्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार झाले आहे. आम्ही तरूंगात जाण्यासाठी तयार आहोत. मात्र अदानी प्रकरणात जेपीसी चौकशीची मागणी करतच राहणार, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

चोराला चोर म्हणणे गुन्हा ठरला- ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी अत्यंत तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. चोराला चोर म्हणणे आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकुमशाहीच्या अंताची ही सुरूवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!