मराठवाड्यात भाकरी फिरली! महायुतीचे आ. सतीश चव्हाण पराभूत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे डॉ. प्रतापसिंह पाटलांचा १८ हजार १२४ मतांनी दणदणीत विजय


छत्रपती संभाजीनगर:  मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रतापिसंह पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा दणदणीत पराभव केला. डॉ. पाटील यांनी आ. चव्हाण यांचा तब्बल १८ हजार १२४ मतांनी दारूण पराभव केला. मराठवाड्यातील पदवीधर मतदारांनी दिलेला हा कौल सत्ताधारी महायुतीसाठी मोठा झटका मानला जात आहे. 

 मतमोजणीेच्या तिसऱ्या फेरीनंतरही विजयासाठी निश्चित करण्यात आलेला ८८ हजार ५५८ मतांचा कोटा एकही उमेदवार पूर्ण न करू शकल्याने बाद फेरीची प्रक्रिया राबवण्यात आली. तब्बल ३९ उमेदवारांची वगळणी (एलिमिनेशन) केल्यानंतरही डॉ.. प्रतापसिंह पाटील यांना मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. मात्र, पाटील यांना सर्वाधिक ८५ हजार ८७६ मते मिळाल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या निवडणुकीत सलग तीन टर्म आमदार राहिलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. डॉ.  प्रतापसिंह पाटील हे १८ हजार १२४ मतांनी विजयी झाले. विजयाची घोषणा होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मराठवाड्यात फटाक्यांची आतषबाजी करत सर्वत्र जल्लोष केला. डाॅ. प्रतापसिंह पाटील यांच्या रुपाने मराठवाडा पदवीधर मतदार संघाला नवखा लोकप्रतिनीधी मिळाला. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आ. सतीश चव्हाण हे मागील तीन वेळा मोठ्या फरकाने विजयी झाले होते. या निवडणुकीत विजयी होऊन सलग चौकार मारण्याचे स्पप्न त्यांनी पाहिले होते. मतमोजणीच्या सुरुवातीपासून ते पिछाडीवरच होते. तीन फेऱ्या आणि त्यानंतर इलिमिनेशन राऊंडमध्येही त्यांना फारशी मते मिळाली नाही. उलट डाॅ. प्रतापसिंह पाटील यांच्या मतांत वाढ होत राहिली. अखेर इलिमिनेशन राऊंड संपल्यानंतर डाॅ. प्रतापसिंह पाटील यांना विजयी घोषीत केले. या घोषणेनंतर आ. सतीश चव्हाण यांचे सलग चौकार मारण्याचे स्पप्न भंगल्याचे दिसून आले.

मराठवाडा पदवीधार मतदार संघाच्या मतमोजणीला चिकलठाणा एमआयडीसी भागातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे मंगळवारी  सकाळी ७ वाजेपासून सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, निवडणूक निरीक्षक माधवी खोडे-चावरे यांच्या देखरेखीखाली मतमोजणीला सुरुवात झाली. मतपत्रिकेचा भलामोठा आकार आणि प्रत्येक मत दाखवून त्याची खात्री करावी लागत असल्याने प्रक्रिया फारच धिम्या पद्धतीने सुरू होती.

मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता ७० हजार ५१९  हजार मतांची पहिली फेरी पूर्ण झाली. यामध्ये ६४ हजार ८१० मते वैध ठरली तर ५ हजार ७०९ मते अवैध ठरली. पहिल्या फेरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे डाॅ.प्रतापसिंह पाटील यांना २७ हजार ९९४ मते, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतीश चव्हाण यांना २० हजार ११६ मते,अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांना ७ हजार ४२४ मते, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप घुगे यांना ३ हजार १६२ मते मिळाली. डॉ. प्रतापसिंह पाटील आणि आ. सतीश चव्हाण यांच्या मतांमध्ये ७ हजार ८७८ मतांचा फरक होता. 

दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला रात्री १० वाजता सुरुवात झाली. बुधवारी पहाटे ६ वाजता दुसरी फेरी घोषित करण्यात आली. दुसऱ्या फेरीत एकूण १ लाख ४० हजार ५४३ मतांची मोजणी पूर्ण झाली. त्यात १लाख २८ हजार ७६० मते वैध ठरली तर ११ हजार ७८३ मते अवैध ठरली. दुसऱ्या फेरीनंतर  डाॅ.प्रतापसिंह पाटील यांना ५४ हजार ९५ मते,आ. सतीश चव्हाण यांना ४३ हजार १६१ मते, अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांना १४ हजार ५९८ मते तर शिवसेना उबाठाचे दिलीप घुगे यांना ६ हजार २१८ मते मिळाली. दुसऱ्या फेरीनंतर प्रतापसिंह पाटील हे १० हजार ९३४ मतांनी आघाडीवर होते. 

तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीला बुधवारी पहाटे २ वाजता सुरुवात झाली. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सकाळी १० वाजता तिसरी फेरी घोषीत करण्यात आली. या फेरीत एकूण १लाख ९३ हजार ६५५  मते मोजण्यात आली. त्यापैकी १ लाख ७७ हजार ११५ मते वैध ठरली तर १६ हजार ५४० मते अवैध ठरली. त्यानुसार विजयासाठी ८८ हजार ५५८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

तिसऱ्या फेरीनंतर  डाॅ. प्रतापसिंह पाटील यांना ७३ हजार ९३१ मते, आ. सतीश चव्हाण यांना ६० हजार ७६८ मते, अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांना १९ हजार ८३५ मते, तर शिवसेना उबाठाचे दिलीप घुगे यांना ८ हजार ४३९ मते मिळाली. तिसऱ्या फेरीनंतर प्रतापसिंह पाटील हे १३ हजार १६९ मतांनी आघाडीवर होते. 

तिसऱ्या फेरीनंतरही विजयासाठी निश्चित केलेला ८८ हजार ५५८ मतांचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे बुधवारी सकाळी ११ वाजता बाद फेरीच्या  (एलिमिनेशन) प्रक्रियेला सुरुवात झाली. सर्वात कमी मते घेतलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात येऊ लागली.

अखेरपर्यंत चुरस

मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण न केल्याने तब्बल ३९ उमेदवारांची दुसऱ्या क्रमांकाची मते मोजावी लागली. उबाठाचे दिलीप घुगे यांची १ हजार ८८१ मते सतीश चव्हाण यांना, २ हजार २८५ मते डॉ. पाटील यांना तर ४७५ मते रविराज साबळे यांना ट्रान्सफर झाली. त्यानंतरच्या फेरीत रविराज साबळे  यांची ३ हजार २४१ मते सतीश चव्हाण यांना तर ६ हजार ४६९ मते डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ट्रान्सफर झाली. सर्व मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने सर्वाधिक मते घेणारे डॉ. प्रतापसिंह पाटील यांना गुरुवारी पहाटे २.५० वाजता विजयी घोषित करण्यात आले. पाटील यांना एकूण ८५ हजार ८७६ मते मिळाली. आ.सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. त्यामुळे डॉ. प्रतापसिंह पाटील यांना १८ हजार १२४ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. 

डाॅ. प्रतापसिंह पाटील  यांना ३८ टक्के मते

तिसऱ्या फेरी अखेर १ लाख ७७ हजार ११५ वैध मते ठरली. तर १६ हजार ५४० मते अवैध ठरली. त्यापैकी डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ३८.१८ टक्के, आ. सतीश चव्हाण यांना ३१.३९ टक्के, रविराज साबळे यांना १०.२४ टक्के, दिलीप घुगे यांना ४.३६ टक्के मते मिळाली. प्रतापसिंह पाटील आणि सतीश चव्हाण यांच्यामध्ये ६.७६ टक्के मतांचा फरक होता. 

आ. चव्हाणांना अतिआत्मविश्वास भोवला

आ. सतीश चव्हाण हे मराठवाडा पदवीधर मतदार संघात सलग तीन वेळा विजयी झाले होते. त्यामुळे या निवडणुकीतही आपला विजय ते निश्चित माणत होते. परंतु यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने डाॅ. प्रतापसिंह पाटील यांच्या माध्यमातून तेवढ्याच ताकदीचा उमेदवार उभा केला. मराठवाड्यात शरद पवार यांना माणनारा मोठा वर्ग आहे. दरवेळी आ. सतीश चव्हाण यांच्या पाठीमागे असणारी शरद पवार गटाची यंत्रणा, संस्थात्मक बळ यावेळी डाॅ. प्रतापसिंह पाटील  यांच्या पाठीमागे होते. शिवाय मागील १८ वर्षांपासून सत्तेवर असल्यामुळे ॲन्टीइनकम्बन्सीचा फटका चव्हाण यांना बसला. मतमोजणीच्या वेळी मतपत्रिकांमध्ये रोष व्यक्त करणाऱ्या चिठ्ठ्या ते दाखवून देत होत्या. आ. सतीश चव्हाण यांचा फटकळ स्वभाव आणि अतिआत्मविश्वास यामुळेही त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. भाजप आणि शिंदेसेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची नाराजीही त्यांना भोवली.  

तब्बल ४० तास चालली मतमोजणी

मराठवाडा पदवीधर मतदार संघाची यावेळची मतमोजणी ही तब्बल ४० तास चालली. मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यावेळी बुधवारी पहाटे निकाल लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु कोणत्याही उमेदवार मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्याने बाद फेरीची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्येही कमी मतदान घेतलेल्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या मतांची दुसऱ्या क्रमांकाची मते मोजण्याची वेळ आली. बुधवारी रात्री १२ वाजता सर्व मते मोजल्यानंतर निकाल घोषित करण्यात आली. सलग ४० तास मोजणी केल्याचा थकवा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. परंतु वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. 

पाटलांना कोणत्याही क्षणी काहीही होण्याची भीती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार डाॅ. प्रतापसिंह पाटील हे मतमोजणी सुरू होण्यापासून मतमोजणी केंद्रात ठाण मांडून होते. इतरही उमेदवार बसून होते. परंतु निवडणुकीचा कल लक्षाच येताच अनेकांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. मात्र, डाॅ. पाटील बसूनच होते. बुधवारी सकाळी तिनही फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली. त्यानंतर सर्वच उमेदवार निघून गेले. परंतु डाॅ. पाटील आणि त्यांचे काही प्रतिनिधी मतमोजणी केंद्राच होते. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, यामुळे आपण मतमोजणी केंद्र सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

प्रमुख तीनही उमेदवार धाराशीव जिल्ह्याचे

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत तब्बल ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. परंतु या निवडणुकीत सर्वाधिक मते घेणारे प्रमुख तिनही उमेदवार हे मूळ धाराशीव जिल्ह्यातील आहेत. तीन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आ. सतीश चव्हाण हे छत्रपती संभाजीनगर शहरात राहत असले तरी ते मूळ धाराशीव जिल्हातील लोहारा तालुक्यातील भातागळी येथील आहे. डाॅ. प्रतापसिंह पाटील हे कळंब तालुक्यातील इटकूर येथील रहिवाशी आहेत. तिसरे अपक्ष उमेदवार आणि सोशल मिडिया गाजविणारे रविराज साबळे पाटील हे धारशीव जिल्हातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथील रहिवाशी आहेत. यावरून या मतदारसंघावर धाराशीव जिल्ह्याचेच वर्चस्व कायम असल्याचे दिसून येत आहे. 

३९ उमेदवारांचे डिपॉजिट जप्त

या निवडणुकीत तब्बल ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निश्चित कोट्याच्या १/६ (एकशष्टांश) पेक्षा कमी मते घेणाऱ्या उमेदवारांचे डिपाॅजिट जप्त होते. त्यानुसार म्हणजे १४ हजार १६९ पेक्षा कमी मते घेणाऱ्या उमेदवारांचे डिपॉजिट झाले आहे. ३ उमेदवारांना एकशष्टांश टक्क्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेना उबाठाचे दिलीप घुगेंसह ३९ उमेदवारांचे डिपाॅजिट जप्त झाले आहे. फक्त डाॅ. प्रतापसिंह पाटील, सतीश चव्हाण आणि अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांचेच डिपॉजिट वाचले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!