मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करून ही धमकी दिली असून सिल्व्हर ओक निवास्थानावरील टेलिफोन ऑपरेटरच्या फिर्यादीवरून गावदेवी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारीच शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी आज त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
एका अज्ञान व्यक्तीने सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवास्थानी फोन केला आणि हिंदी भाषेतून ‘शरद पवारांना देशी कट्ट्याने ठार मारू,’ अशी धमकी दिली आहे. सिल्व्हर ओक निवासस्थानी तैनात असलेल्या पोलिसांच्या फोन ऑपरेटरने याबाबत गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
फोन करणारी व्यक्ती हिंदीतून बोलत होती आणि देशी कट्ट्याच्या सहाय्याने शरद पवारांना ठार मारू, अशी धमकी त्या व्यक्तीने दिली. या धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पोलिस आता धमकीचा फोन करणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.