मुंबईः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगत चालली आहे. विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. काही ठिकाणी जाहीर केलेले उमेदवार बदलले जात आहेत आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार गटाकडून आज लोकसभेचे दोन उमेदवार जाहीर केले असून बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आधी जाहीर केलेला उमेदवार बदलला असून आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकिट कापून भाजपने त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. बीडमधील महायुतीचा उमेदवार उमेदवार जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी बीडमधून पंकजा मुंडेंच्या विरोधात कोणाला मैदानात उतरवते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. महाविकास आघाडीत बीडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार गटाला सुटली आहे. आज राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना ही निवडणूक चांगलीच जड जाण्याची शक्यता आहे. भिंवडीमधून राष्ट्रवादीने सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे.
वंचितने परभणीचा उमेदवार बदलला
वंचित बहुजन आघाडीने परभणी लोकसभा मतदारसंघातून बुधवारी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु रात्रीतून चक्रे फिरली आणि वंचितने उमेदवार बदलून आज ऐनवेळी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. आज गुरूवारी पंजाबराव डख यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
यवतमाळ-वाशिममध्येही वंचितची खेळी
यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवरी नाकारली आहे. त्यांच्याऐवजी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने यवतमाळ-वाशिम मतदारसंघात जाहीर केलेला उमेदवार बदलला आहे.
वंचितने आधी यवतमाळ-वाशिमसाठी सुभाष पवार यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी अचानाक उमेदवार बदलण्याचा निर्णय जाहीर केला. तेथे सुभाष पवार यांच्याऐवजी अभिजीत राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यवतमाळ-वाशमिमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. राठोड यांनी आज वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.