आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून यथेच्छ धुलाई आणि विटंबनेचा गुन्हा दाखल होताच अभाविपची कल्टी; पण ‘हे’ पाच प्रश्न अनुत्तरीत!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक इमारतींचे विद्रुपीकरण आणि ‘एबीव्हीपी’ अशी अक्षरे लिहून फुले- आंबेडकरांच्या नामफलकाची विटंबना केल्यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांची यथेच्छ धुलाई केली. धुलाईचा प्रसाद आणि विटंबना करून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर  अभाविपने कल्टी मारली आणि फुले-आंबेडकरांचे नाव असलेल्या नामफलकावर अभाविपला बदनाम करण्यासाठी ‘एबीव्हीपी’ अक्षरे लिहिली, असा पवित्रा घेतला आहे. परंतु अभाविपच्या या पवित्र्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. ते प्रश्नच अभाविपच्या खोटेपणाचा बुरखा फाडणारे आहेत.

विद्यापीठ परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी १६ ऑक्टोबरच्या रात्री विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक इमारती, वॉल कंपाऊड आणि म. फुले- डॉ. आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्राच्या नामफलकावरही इंग्रजीत ‘एबीव्हीपी’ अशी अक्षरे लिहून विटंबना केली.

हेही वाचाः ‘डॉ.बामु’ परिसराचे अभाविपकडून विद्रुपीकरण, महापुरूषांचा नामोल्लेख असलेल्या नामफलकांचीही विटंबना; विद्यापीठ प्रशासनाचा मात्र कानाडोळा!

हा प्रकार लक्षात येताच आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तातडीने प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांची भेट घेऊन विद्रुपीकरण आणि विटंबना करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई करून घेण्याची मागणी केली. परंतु डॉ. शिरसाठ यांनी या महापुरूषांच्या नावाच्या विटंबनेचे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप आंबेडकरी विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

प्र-कुलगुरूंकडून मिळालेला प्रतिसाद पाहता आंबेडकरी विद्यार्थी संघटना खवळल्या. त्यातच विद्यापीठ परिसराचे विद्रुपीकरण आणि महापुरूषांची विटंबना करणाऱ्या अभाविपचे कार्यकर्ते विद्यापीठ परिसरात आल्याचे समजताच त्यांना गाठून बेदम चोप दिला. त्यामुळे विद्यापीठात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचाः फुले-आंबेडकरांच्या नामफलकाची विटंबना: अभाविपच्या कार्यकर्त्यांची आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून यथेच्छ धुलाई, विद्यापीठ बंदची हाक

आधी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत अभाविपच्या कार्यकर्त्यांची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर बेगमपुरा पोलिस ठाणे गाठून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी महापुरूषांची विटंबना करून आमच्या धार्मिक भावना दुखावल्याची फिर्याद दिली. त्यावरून बेगमपुरा पोलिसांनी ऋषीकेश केकाण, अभिषेक गावडे आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भादंविच्या कलम २९५, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

हे प्रकरण अंगलट आल्याचे लक्षात येताच मग अभाविपने कल्टी मारली. मंगळवारी रात्री उशिरा एक पत्रक जारी करून अंग झटकण्याचा प्रयत्न केला. ‘१६ ऑक्टोबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठात अज्ञात व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या फलकावर ‘ABVP’ हे नाव काढून विद्यार्थी परिषदेचे नाव ठरवून बदमान करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब लक्षात येताच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हे नाव पुसून टाकले,’ असे अभाविपने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अभाविपला न्यूजटाऊनचे पाच प्रश्न

अभाविपने या विद्रुपीकरण आणि विटंबनेची जबाबदारी झटकली असली तरी यानिमित्ताने काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरेही अभाविपकडूनच अपेक्षित आहेत.

  • म. फुले-डॉ. आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्राच्या नामफलकावर ‘एबीव्हीपी’ अशी इंग्रजी अक्षरे लिहिलेला रंग आणि विद्यापीठ परिसरात अन्य ठिकाणी ‘एबीव्हीपी’ अक्षरे लिहिलेला रंग सारखाच कसा?
  • विद्यापीठ परिसरात आम्ही भिंतीवर वॉस पेंटिग केली, अशी कबुली अभाविपचे शहराध्यक्ष ऋषिकेश केकाण देतात. विद्यापीठ परिसरातील विविध भिंतीवर ‘एबीव्हीपी’ ही इंग्रजी अक्षरे लिहिण्यासाठी स्प्रेपेंटिगचा वापर करण्यात आला. त्याच स्प्रे पेटिंगचा वापर म. फुले- डॉ. आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्राच्या नामफलकावरही ‘एबीव्हीपी’ इंग्रजी अक्षरे लिहिण्यासाठी कसा?
  • ‘एबीव्हीपी’ ही इंग्रजी अक्षरे लिहून विटंबना केलेल्या नामफलकावरील हस्ताक्षर शैली आणि विद्यापीठ परिसरात अन्य ठिकाणी लिहिलेल्या ‘एबीव्हीपी’, ‘जॉइन एबीव्हीपी’ या इंग्रजी अक्षरांच्या हस्ताक्षर शैलीत साम्य कसे?
  • अभाविपला विद्यापीठ परिसरात वॉल पेंटिंगच करायचे होते तर ती करण्यासाठी रात्री ११ वाजेनंतरचीच वेळ का निवडली?  रात्रीच्या अंधारातच हे काम करण्यामागचा हेतू नेमका काय होता? रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन विद्यापीठ परिसराचे विद्रुपीकरण करणे ही अभाविपला ‘गुंडगिरी’ वाटत नाही का?
  • म. फुले- डॉ. आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्राच्या नामफलकावर ‘एबीव्हीपी’ ही अक्षरे लिहिण्याचा प्रकार निंदनीय आहे, असे अभाविपचे जर म्हणणे असेल तर त्यांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांआधी याबाबतची तक्रार विद्यापीठ प्रशासन किंवा पोलिसांत का केली नाही?

‘ज्ञान’, ‘शील’ आणि ‘एकता’ असे अभाविपचे ब्रीद वाक्य आहे. सत्याला सामोरे जाणे आणि सत्याची कबुली देणे याचा अंतर्भाव ‘शील’ या तत्वात होतो. त्यामुळे अभाविपने न्यूजटाऊनच्या या पाच प्रश्नांची उत्तरे जाहीरपणे देऊन त्यांचे ‘शील’ अबाधित असल्याचे दाखवून द्यावे, असे न्यूजटाऊनचे खुले आव्हान आहे. कोणत्याही विद्यार्थी चळवळीच्या उत्कर्षासाठी ते आवश्यक आहे! बेगमपुरा पोलिसही त्यांच्या तपासात याच प्रश्नांच्या दिशेने तपास करतील, अशी शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!