फुले-आंबेडकरांच्या नामफलकाची विटंबना: अभाविपच्या कार्यकर्त्यांची आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून यथेच्छ धुलाई, उद्या विद्यापीठ बंदची हाक


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचा नामोल्लेख असलेल्या नामफलकाची विटंबना आणि विद्यापीठ परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांची आज (१७ ऑक्टोबर) संतप्त आंबेडकरी कार्यकर्त्यांनी यथेच्छ धुलाई केली. त्यामुळे विद्यापीठ परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, महापुरूषांच्या नामफलकाची विटंबना आणि विद्यापीठ परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा, या मागणीसाठी बुधवारी (१८ ऑक्टोबर) सर्व आंबेडकरी संघटनांनी विद्यापीठ बंदची हाक दिली आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची विद्यार्थी आघाडी असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसरात ठिकठिकाणी अभाविप अशी अक्षरे स्प्रे पेंटिंग लिहिली. या कार्यकर्त्यांनी हेतुतः म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख असलेल्या नामफलकावरही ‘अभाविप’ अशी अक्षरे लिहिली. त्यामुळे विद्यापीठ परिसरात कार्यरत असलेल्या आंबेडकरी-परिवर्तनवादी विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या.

संतप्त आंबेडकरी विद्यार्थी संघटनांनी याबाबत काल सोमवारीच विद्यार्थी संघटनांनी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांची भेट घेऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. परंतु विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे ‘आमचे कुणीच काही करू शकत नाही’ अशा अविर्भावात अभाविपचे कार्यकर्ते विद्यापीठ परिसरात आले. ते कळताच खवळलेल्या आंबेडकरी विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाठून त्यांची यथेच्छ धुलाई केली.

पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलिस विद्यापीठ परिसरात दाखल झाले. त्यांनी संतप्त विद्यार्थी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु आंबेडकरी विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते एवढे संतप्त झाले होते की, त्यांनी अभाविप आणि जातीयवादी शक्तींविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत विद्यापीठ परिसर दणाणून सोडला.

व्यवस्थापन परिषद सदस्य सानपांना धक्काबुक्की

हा सगळा राडा सुरू असतानाच अभाविपचे कार्यकर्ते आणि राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आंबेडकरी विद्यार्थी संघटनांची घोषणाबाजी सुरू असलेल्या ठिकाणी आले. ते दिसताच आंबेडकरी विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आणखी खवळले. त्यांनी थेट गजानन सानप यांना धक्काबुक्की करत मारझोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून गजानन सानप यांना विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या तावडीतून सोडवून सुरक्षित स्थळी हलवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

या आंदोलनाचे नेतृत्व सचिन निकम, राहुल वडमारे, निलेश आंबेवाडीकर, गुणरत्न सोनवणे, अतुल कांबळे, अमित घनघाव, संदीप तुपसमिंद्रे इत्यादी आंबेडकरी विद्यार्थी नेत्यांनी केले. पोलिसांनी मध्यस्थी करून या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सुमारे दीडतास चाललेला राडा शांत झाला.

बुधवारी विद्यापीठ बंदची हाक

महापुरूषांच्या नामफलकाची विटंबना आणि विद्यापीठ परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करा, या मागणीसाठी सर्व आंबेडकरी विद्यार्थी संघटना एकवटल्या असून या सर्व संघटनांनी बुधवारी (१८ ऑक्टोबर) विद्यापीठ बंदची हाक दिली आहे.

या आंदोलनात रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पॅँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन बहुजन सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, एमआयएम विद्यार्थी आघाडी, युवक काँग्रेस, एनएसयूआय, रिपाइं युवक आघाडी, एसएफआय, एआयएसएफ, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, भीमशक्ती संघटना इत्यादी आंबेडकरी-परिवर्तनवादी संघटना सहभागी होणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!