डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आरएसएस: समता आणि बहुसंख्याकतेच्या हिंदुत्वातील वैचारिक संघर्ष


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग म्हणजे विवेक, बंधुता, समता आणि न्याय तर आरएसएसचा मार्ग म्हणजे संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि हिंदू एकात्मता. एका मार्गाचा उद्देश मानवाला मुक्त करणे होता, तर दुसऱ्याचा उद्देश संस्कृतीच्या चौकटीत सर्वांना बंदिस्त करून घेणे हा होता. या दोन विचारसरणींच्या संघर्षातूनच भारतीय लोकशाहीचा चेहराच ठरला.

  • प्रवीण बागडे, नागपूर

भारताच्या सामाजिक विचारविश्वात दोन प्रवाह कायम एकमेकांना छेद देत आले आहेत. एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा आणि मानवमुक्तीचा विचार आणि दुसरा म्हणजे आरएसएसचा हिंदुत्ववादी राष्ट्रवाद. या दोन विचारप्रवाहांचा संघर्ष हा केवळ इतिहासातील प्रसंग नसून तो आजही भारतीय लोकशाहीच्या आत्म्याला आकार देणारा संघर्ष आहे. एकीकडे आंबेडकरांचा विवेकाधारित, वैज्ञानिक, समतेवर उभा विचार आहे; तर दुसरीकडे आरएसएसचा संस्कृतीकेंद्रित, बहुसंख्याकवादी दृष्टिकोन आहे. या दोन विचारधारांचा संघर्ष म्हणजे भारताच्या आत्म्याचा संघर्ष म्हणजे मानवतेचा विरुद्ध अधिराज्याचा!

भारताच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात दोन प्रवाह सतत एकमेकांसमोर उभे राहतात. एक म्हणजे समतेचा आणि मानवमुक्तीचा विचार, ज्याचे प्रतिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि दुसरा म्हणजे हिंदुत्वाचा विचार, ज्याचे प्रतिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आहे. या दोन्ही विचारप्रवाहांमधील संघर्ष हा केवळ व्यक्तिगत नव्हता, तर तो भारतीय समाजाच्या आत्म्याशी संबंधित वैचारिक संघर्ष होता.

हेही वाचाः राज्यघटनेचे खरे शिल्पकार कोण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की बी.एन.राव? वाचा मनुवादी बांडगुळांच्या अपप्रचाराची पोलखोल

डॉ. आंबेडकर यांनी भारतातील हजारो वर्षांच्या जातिव्यवस्थेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला समतेचे आणि न्यायाचे स्वप्न दाखवले. त्यांचा समाजदर्शनाचा पाया होता ‘मानव माणसाचा शत्रू नाही, सर्व माणसे समान आहेत.’ ते धर्माकडे अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर सामाजिक पुनर्रचनेचे साधन म्हणून पाहत होते. म्हणूनच त्यांनी स्पष्ट सांगितले की, ‘मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.’  त्यांच्यासाठी धर्म म्हणजे मानवतेचा, समतेचा आणि न्यायाचा मार्ग. म्हणूनच त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. कारण तो विवेक, करुणा आणि समता शिकवतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे आणि मानवमुक्तीचे शिल्पकार होते.

एकात्मतेच्या नावाखाली सामाजिक अधिराज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९२५ पासून भारतात ‘हिंदू राष्ट्र’  या संकल्पनेचा प्रचार केला. संघाच्या दृष्टीने ‘हिंदुत्व’ हे केवळ धर्म नव्हे, तर संस्कृती आणि राष्ट्रभावना आहे. पण या विचारात समता नव्हती  तर ‘बहुसंख्याकत्व’ आणि ‘संस्कृतीचे एकरूपत्व’ यावर भर होता. आरएसएसचा दृष्टिकोन असा होता की, भारतात राहणारे सर्व लोक हे ‘हिंदू संस्कृतीचे’ वारसदार आहेत; त्यामुळे त्यांनी हिंदू म्हणून स्वतःला ओळखले पाहिजे. हा विचार वरवर एकात्मतेचा भास देतो, परंतु प्रत्यक्षात जातिव्यवस्थेच्या पायावर उभ्या असलेल्या सामाजिक विषमतेला तो हात लावीत नाही. डॉ. आंबेडकर यांचा यालाच विरोध होता.

हेही वाचाः ‘भारतीय संविधानाच्या उद्देशिकेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ शब्द हटवले!’

डॉ. आंबेडकर यांनी समाजाच्या रचनेत मूलभूत बदल करण्याची मागणी केली. ते म्हणाले, ‘राजकीय स्वातंत्र्य मिळाले तरी सामाजिक आणि आर्थिक विषमता टिकली, तर ते स्वातंत्र्य टिकणार नाही.’ पण आरएसएसचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांच्या दृष्टीने ‘संस्कृतीचे रक्षण’ हे ‘सामाजिक बदलांपेक्षा’ अधिक महत्त्वाचे होते. या कारणाने डॉ. आंबेडकरांना आरएसएसचा हिंदुत्ववाद ‘सामाजिक न्यायविरोधी’ वाटला. त्यांनी इशारा दिला होता की, ‘हिंदू धर्माने जर आपले सामाजिक दोष दूर केले नाहीत, तर हा देश तुटेल.’ त्यांचा संघर्ष सत्तेसाठी नव्हे, तर समाज परिवर्तनासाठी होता. डॉ. आंबेडकरांचा मार्ग म्हणजे विवेक, बंधुता, समता आणि न्याय तर आरएसएसचा मार्ग म्हणजे संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि हिंदू एकात्मता. एका मार्गाचा उद्देश मानवाला मुक्त करणे होता, तर दुसऱ्याचा उद्देश संस्कृतीच्या चौकटीत सर्वांना बंदिस्त करून घेणे हा होता. या दोन विचारसरणींच्या संघर्षातून भारतीय लोकशाहीचा चेहराच ठरला.

हेही वाचाः मसापच्या निवडणुकीत आरएसएसच्या ‘दांड्या’वर परिवर्तन मंचचा ‘झेंडा’, आंबेडकरवाद्यांचा ‘विद्रोह’ही संघाच्या दावणीला?

आजही समाजात धर्माच्या नावावर द्वेष पसरवला जातो. अल्पसंख्याकांवर अन्याय होतो आणि जातिव्यवस्थाही नष्ट झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचा समतेचा संदेश आज अधिकच महत्त्वाचा ठरतो. त्यांनी सांगितलेला ‘संविधान हा माझा धर्मग्रंथ आहे’  हा संदेश आपण विसरता कामा नये.

आरएसएसच्या ‘हिंदू राष्ट्रा’च्या संकल्पनेपेक्षा डॉ. आंबेडकरांची ‘मानव राष्ट्रा’ची कल्पना अधिक व्यापक, न्यायपूर्ण आणि लोकशाही  प्रधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आरएसएस यांच्यातील संघर्ष हा केवळ धार्मिक नव्हता, तर तो मानवमुक्ती विरुद्ध सामाजिक अधिराज्य यांच्यातील होता.

हेही वाचाः मुलगा ईनायत परदेशीच करायचा सत्यशोधक विचारवंत सरोज कांबळे यांचा अमानुष छळ; धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनकडे!

डॉ. आंबेडकरांचा विचार हा समतेचा दीपस्तंभ आहे. जो भारतीय लोकशाहीला दिशा देतो; तर आरएसएसचा विचार हा एकरूपतेच्या अंधारात समाजाला मागे ओढणारा आहे. आजच्या पिढीने ठरवायचे आहे. आपण ‘हिंदू राष्ट्राचे नागरिक’  होऊ इच्छितो  की ‘समतेच्या भारताचे नागरिक?’ डॉ. आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग स्पष्ट आहे. ‘समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हेच खरे धर्माचे रूप आहे.’

हेही वाचाः ‘गावात भीम जयंती काढता का?… दत्ता, खतम करून टाक याला…’ नांदेडचा मृत बौद्ध तरूण अक्षयच्या भावाचा जबाब जशाचा तसा…

संविधानाचा धर्म विरुद्ध बहुसंख्याकतेचा एकाधिकार

आजच्या भारतात संविधानाचे मूल्य आणि लोकशाहीचे तत्व यांवर प्रश्नचिन्ह उभे राहात असताना डॉ. आंबेडकरांची समतेवरील श्रद्धा आणि बंधुत्वाचा संदेश पुन्हा जिवंत करणे अत्यावश्यक आहे. संविधानाचा धर्म आणि हिंदुत्वाचा विचार हे दोन मार्ग आजही आपल्या समाजासमोर उभे आहेत. एक मार्ग न्याय, समानता आणि स्वातंत्र्याकडे नेतो; तर दुसरा मार्ग बहुसंख्याकतेच्या एकाधिकाराकडे. आता निर्णय आपल्या हातात आहे. आपण ‘हिंदू राष्ट्राचे अनुयायी’ व्हायचे की ‘समतेच्या भारताचे नागरिक’ व्हायचे? कारण इतिहास साक्ष आहे. ज्यांनी समतेचा मार्ग निवडला, त्यांच्याच हातात भविष्याचे लेखन असते. (लेखकाचा संपर्कः ९९२३६ २०९१९)

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!