
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी ‘माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. त्यापाठोपाठ ‘लाडका भाऊ’ योजनाही समोर आली. मुख्यमंत्र्यांच्या या लाडक्या बहीण-भावांची मुले, पुतणा-पुतणी, भाचा-भाचींपैकी नोकरीसाठी रानोमाळ भटकत आहेत तर २००५ नंतर सरकारी नोकरीत रूजू झालेले काहीजण जुन्या पेन्शन योजनेसाठी झगडत आहेत. आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या बहिणींना मात्र सावत्र बहिणींसारखी वागणूक दिली जात आहे… या दोन्ही योजनांच्या पार्श्वभूमीवर डॉ. मनोज निकाळजे यांनी मुख्यमंत्र्यांना अनावृत्त पत्र लिहून उपस्थित केलेले काही मूलभूत प्रश्न…
मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब अर्थात लाडके साले साहेब,
सस्नेह नमस्कार
लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही संमिश्र अशा पद्धतीने असणारे यश मिळालं. त्यानंतर आपण राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावरील चर्चा चालू असताना आपण काही घोषणा केल्या आणि अजूनही आपल्या घोषणांचा पाऊस चालूच आहे.
महाराष्ट्रात कुठे पाऊस पडतो आहे तर कुठे पडत नाहीये. परंतु आपल्या घोषणांच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्र न्हावून निघाला आहे. आपण पहिली घोषणा केली ती ‘लाडकी बहीण योजने’ची. आता अलीकडेच आपण ‘लाडका भाऊ योजना’ सुद्धा जाहीर केली. यावरून असं दिसतंय की आपणसुद्धा जरांगे पाटील यांच्याप्रमाणे सगे-सोयऱ्यांचेच राजकारण करत आहात.
मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे की, आपली ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ हे दोघेही विवाहित आहेत आणि विवाहानंतर त्यांना मुलेसुद्धा झाली आहेत. म्हणजेच आता त्याचे भाचा-भाची, पुतणा-पुतणी हे सुद्धा आता आपल्या कुटुंबाचे सदस्य आहेत, याचं देखील भान असावं, याची यानिमित्ताने आपल्याला केवळ आठवण करून दिली आहे.
आपल्या बहिणी ज्या २१ ते ६० या वयोगटातील आहेत, त्या बहिणींची आणि भावांची मुले अर्थात आपले ‘लाडके भाचे’ आणि लाडक्या भाच्या, लाडके पुतणा-पुतणी यांनी पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएचडी, सेट-नेट अशा पद्धतीचे शिक्षण घेतलेले आहेत आणि नोकरीसाठी ते वणवण भटकत आहेत. यातील काही जण गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कंत्राटी-तासिका तत्त्वावर काम करत आहेत. माननीय साले साहेब, आपल्या बऱ्याचशा बहिणी-भाऊ तथा आपल्या बहिणींचा नवरा अर्थात आपला मेव्हणा तसेच आपल्या भावाची पत्नी म्हणजे आपली सुनबाई ही २००५ नंतर काही प्रमाणामध्ये नोकरीसुद्धा करत आहेत आणि त्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी लढा सुद्धा देत आहेत.
महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका म्हणून काम करणाऱ्या सुद्धा आपल्या अनेक भगिनी आहेत. त्यासुद्धा त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी अनेक वर्षांपासून झगडत आहेत, आंदोलन करीत आहेत. त्या आपल्या सख्ख्या बहिणी आहेत की सावत्र बहिणी आहेत हे देखील महाराष्ट्राला कळू द्या. त्या जर आपल्या भगिनी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा काही सकारात्मक अशा पद्धतीच्या योजना किंवा घोषणा कराल ही माफक अपेक्षा.
या सगळ्या घोषणा आपण केल्या ही महाराष्ट्रातील आपल्या बहिणी आणि भावांसाठी आनंदाचीच गोष्ट आहे. परंतु या योजना किती काळ टिकतील याचा आपण सर्वांकष विचार केला आहे का? अशा योजनांची अंमलबजावणी करून आपणास आपल्या जवळील नातलगांना पंगू करायचे आहे का? आपल्या या लाडक्या बहीण-भावांनी केवळ आपल्या घोषणा आणि योजनांचा लाभ घेत बसावे आणि इतर कुठलेही काम करू नये किंवा काम करण्यासाठी प्रवृत्त होऊ नये, असा तर आपला मनसुबा नाही ना?
आपल्या अशा या घोषणांमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर किती आर्थिक बोजा पडेल याचा आपण विचार केला आहे का?, महाराष्ट्राच्या डोक्यावर किती लाख कोटींचे कर्ज आहे?, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न किती आहे? याचा विचार महाराष्ट्राचे अर्थमंत्री जुन्या पेन्शन योजनेची मागणी कशी मान्य करता येणार नाही, हे सांगताना करतात. परंतु आपण अशा घोषणा करत असताना आपल्या अर्थमंत्र्यांना या सगळ्याच गोष्टींचा विसर कसा पडतो?
आपण आपल्या लाडक्या बहिणींचा आणि लाडक्या भावाचा ज्या पद्धतीने विचार केला त्याच पद्धतीने बहिणींची मुले, भाचा आणि भाच्या तसेच भावांची मुले, पुतणा आणि पुतण्या त्याचबरोबर बहिणींचे पती म्हणजे आपले मेहुणे व आपल्या भावांची पत्नी म्हणजे आपली सूनबाई यांचा विचार करून त्यांना कायमस्वरूपी त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी तद्वतच २००५ नंतर नियुक्त आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाने जगता येईल, याची तजवीज कराल, हीच माफक अपेक्षा!
आपलाच लाडका मेव्हणा,
डॉ. मनोज निकाळजे

