लग्नास नकार दिल्यामुळे तरूणाने स्वतः जाळून घेतले आणि मग मारली प्रेयसीला मिठी; तरूणाचा मृत्यू, तरूणी गंभीर


औरंगाबादः प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेऊन त्याच अवस्थेत प्रेयसीला मिठी मारणाऱ्या तरूणाचा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पीडित तरूणीवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबादच्या शासकीय विज्ञान संस्थेत पीएच.डी. करणारा गजानन मुंडेचे पीएच.डी. करणाऱ्या एका तरूणीशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. गजाननने लग्नाचा तगादा लावला होता. मात्र तिचा त्याला विरोध होता. त्यामुळे दोघांत बेबनाव झाला होता. प्रेयसीने आपला वापर करून घेतला आणि आता ती आपल्याशी लग्न करण्यास नकार देत असल्याचा राग गजाजनच्या मनात होता.

गजाननच्या प्रेयसीचे प्राणीशास्त्र विषयातील प्रोजेक्टवर काम सुरू होते. त्यासाठी  काल सोमवारी ती मार्गदर्शक प्राध्यापकाच्या केबिनमध्ये गेली होती. तिच्या पाठोपाठ गजाननही तेथे आला. त्याच्याकडे पेट्रोलने भरलेल्या दोन बाटल्या होत्या. त्याने प्राध्यापकाच्या केबिनचा दरवाजा आतून बंद केला. त्याने तरूणी व स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि लाटरच्या साह्याने स्वतःला पेटवून घेतले. आगीचा भडका उडताच त्याने तरूणीला मिठी मारली. यात गजानन जवळपास ८५ टक्के तर तरूणी ५० टक्के भाजली. दोघांनाही घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री बारा वाजेच्या गजाननचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरूणीवर उपचार सुरू आहेत.

मृत्यूपूर्व जबाबात तरूणीने फसवल्याचा आरोपः पोलिसांनी गजाननचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवून घेतला आहे. तरूणीने माझ्याशी लग्न केले होते. नंतर विश्वासघात केला. मी तिच्यावर आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले आहेत. तरीही ती माझ्यासोबत राहत नाही. मला नेहमी टाळते. माझ्या प्रेमाला ती ओळखू शकली नाही. आता आपण जगायचे नाही आणि तिलाही जिवंत ठेवायचे नाही, असे ठरवून हे पाऊल उचलल्याचे गजाननने मृत्यूपूर्व जबाबात म्हटले आहे.

गजाननच्या आईवडिलांकडून तरूणीला धमक्याः दरम्यान, तरूणीच्या नातलगांनी गजाननच्या आईवडिलांविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे. गजाननसोबतच त्याचे आईवडिलही तरूणीला धमकावत होते. तू गजाननसोबत लग्न केले नाही तर आम्ही दोघेही जीव देऊ, अशा धमक्या त्यांच्याकडून पूजाला देण्यात येत होत्या, असे या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी गजाननच्या आईवडिलांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!