‘हर हर महादेव’!: राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा विवीयाना मॉलमधील शो बंद पाडल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी अटक केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत आ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ११ कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. आज सकाळी वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह ११ कार्यकर्त्यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते.

न्यायालयात आव्हाडांचे वकील आणि सरकारी वकिलात जोरदार युक्तीवाद झाला. पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी जितेंद्र आव्हाडांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आव्हाडांच्या वकिलांकडून आव्हांडाच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला. त्यांच्या जामीन अर्जावर दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुनावणी सुरू झाली आणि युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या १२ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केला.

 वर्तकनगर पोलिसांनी आ. आव्हाडांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. विशेषतः या कार्यकर्त्यांमध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. न्यायालयाच्या दिशेने येणारे तिन्ही रस्ते पोलिसांनी बंद केले होते.

 जामीन, जेवण दोन्ही मिळाले-जितेंद्र आव्हाडः काही लोकांना जमिनीवर आणायचे असेल तर जामिनाची पर्वा करायची नसते. ‘चाणक्य’ नीती फसली. अटकेनंतर जामीन आणि जेवण दोन्ही मिळाले, असे ट्विट जामिनानंतर आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘तुमचं आमचं नातं काय? जय शिवाजी… जय शिवाजी…’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

काय आहे प्रकरण?: सोमवारी रात्री विवीयाना सिनेमागृहात हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरू झाल्यानंतर या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेक्षकांना सिनेमागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही सिनेमागृहात बसून राहिलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावले होते. त्यावेळी किरकोळ वादावादीही झाली होती. त्यात एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड,आनंद परांजपे यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!