पुणे जातपडताळणी समितीच्या अध्यक्षांकडूनच भरबैठकीत मागासवर्गीय अधिकाऱ्यांना उद्देशून जातीवाचक शब्दाचा वापर


पुणेः पुणे जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा ज्योत्सना पडियार-हिरमुखे यांनी भरबैठकीतच जोरजोरात ओरडत जातीवाचक शब्दांचा वापर करून मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपमानित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पडियार यांच्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

पुणे जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा ज्योत्सना पडियार- हिरमुखे यांनी १५ जुलै रोजी त्यांच्या दालनात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला समितीचे संशोधन अधिकारी व उपायुक्त डॉ. दीपक खरात यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बैठक सुरू झाल्यानंतर ज्योत्सना पडियार-हिरमुखे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाबाबत सूचना देत असताना धेडगुजरीपणाचे कामकाज मला चालणार नाही, असे जोरजोरात ओरडून सूचना द्यायला सुरूवात केली. त्यांच्या बोलण्यात वारंवार ‘धेडगुजरीपणा’ या जातीवाचक शब्दाचा वापर केला जाऊ लागला. त्यामुळे बैठकीला हजर असलेले मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी अपमानित झाले. विशेष म्हणजे ज्योत्सना पडियार-हिरमुखे या अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) दर्जाच्या अधिकारी आहेत.

समितीच्या अध्यक्षांकडूनच जातीवाचक शब्दांचा वापर जाणीवपूर्वक केला जात असतानाही आपल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला जाब कसा विचारायचा? असा प्रश्न पडून बैठकीला हजर असलेले अधिकारी-कर्मचारी गप्प बसले. परंतु ज्योत्सना हिरमुखे-पडियार या पूर्वग्रह दूषित हेतुने आणि आपणाला अपमानित करण्याच्या उद्देशानेच ‘धेडगुजरीपणा’ या जातीवाचक शब्दाचा हेतुतः वापर करत असल्याची सल त्यांच्या मनात बोचत राहिली.

समितीच्या अध्यक्षांकडून जातीयद्वेषातून अपमानित झालेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बैठक संपल्यानंतर एकत्र येऊन ज्योत्सना पडियार-हिरमुखे यांची जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्तांकडे त्याच दिवशी लेखी तक्रार केली. मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी ज्या कार्यालयामार्फत विविध योजना राबवल्या जातात, त्याच कार्यालयात जर एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडून मागासवर्गीयांबद्दल पूर्वग्रह दूषित ठेवून काम केले जात असेल तर मागासवर्गीयांनी जाब कोणाला विचारायचा? असा सवाल या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तक्रारीत केला आहे.

जातप्रमाणपत्र समितीच्या अध्यक्षा ज्योत्सना पडियार- हिरमुखे यांना बैठकीत आम्हाला जाब विचारता आला नाही. परंतु त्यांनी मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना उद्देशून ‘धेडगुजरीपणा’ या जातीवाचक शब्दाचा हेतुतः वापर केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही या तक्रारीत देण्यात आला आहे. या तक्रारीवर पुणे जिल्हा जातप्रमाणपत्र समिती कार्यालयातील १३ अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बार्टीकडून कोणतीच कारवाई नाही!

पुणे जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेली लेखी तक्रार उपायुक्त डॉ. दीपक खरात यांनी त्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे (बार्टी)  पुढील कार्यवाहीसाठी वर्ग केली. ही तक्रार बार्टीकडे वर्ग करून पाच दिवस उलटत आले तरी बार्टीचे महासंचालक  व जातप्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक सुनील वारे यांनी त्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही की साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे बार्टीच्या महासंचालकांकडून ज्योत्सना पडियार-हिरमुखे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!