राज्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार तीन मूल्यांकन चाचण्या, वेळापत्रक जाहीर


पुणेः राज्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना तीन मूल्यांकन चाचण्या द्याव्या लागणार आहेत. स्टार्स प्रकल्पाअंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी आणि दोन संकलित मूल्यमापन चाचण्या अशा तीन चाचण्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १७ ते १९ ऑगस्टदरम्यान पायाभूत चाचणी होणार असून अन्य दोन चाचण्या ऑक्टोबर आणि एप्रिल महिन्यात घेतल्या जातील, असे विद्या प्राधिकरणाने जाहीर केले आहे.

शासकीय आणि जिल्हा परिषद, नगर परिषदासारख्या स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांतील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्या मागील वर्षीच्या इयत्तेचा अभ्यासक्रम आणि मुलभूत क्षमता यावर आधारित असतील.

 तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीमध्ये १७ ऑगस्टला भाषा विषय, १८ ऑगस्टला गणित आणि १९ ऑगस्ट रोजी इंग्रजी विषयाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

पहिली संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल. दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन असल्याचे विद्या प्राधिकरणाने म्हटले आहे.

 राज्यभरातील शाळांना पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिकांसोबत शिक्षक सूचनापत्र, विषयनिहाय, शाळानिहाय आणि इयत्तानिहाय उत्तरसूची पुरवण्यात येणार आहे. या चाचण्या दहावी किंवा बारावीच्या परीक्षेप्रमाणे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण देऊ नये, अशी सूचना विद्या प्राधिकरणाचे प्रभारी संचालक कृष्णकुमार पाटील यांनी केली आहे. प्रश्नपत्रिका फाटणार किंवा भिजणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

अध्यापन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी चाचण्या

 अध्याप प्रक्रिया सुलभ करण्यास मदत व्हावी, हा या चाचण्यांचा मुख्य हेतू आहे. या चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादणूक पडताळणे, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातील संपादणूक वाढवण्यास मदत करणे आणि अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करणे हा या चाचण्यांचा उद्देश आहे. या चाचण्यांच्या माध्यमातून विषयनिहाय राज्याची संपादणूक स्थिती समजून घेतली जाणार असल्याचे विद्या प्राधिकरणाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!