
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेमध्ये विविध अशासकीय पदांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात येणार असून त्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कंत्राटी भरतीमध्ये सुतार, शिपाई, ग्राऊंडम्सन, स्वयंपाकी, मसालची, सफाईगार, वाहनचालक, डिटिपी ऑपरेटर व सहायक लिपिक यांचे प्रत्येकी एक (०१) पदे आहेत. तरी जास्तीत जास्त माजी सैनिक व इतर इच्छूक पात्र उमेदवारांनी छत्रपती संभाजीनगर येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, सेक्टर-एन-१२, सिडको येथे १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आपल्या संबंधित आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे संचालक कर्नल (निवृत्त)मकरंद देशमुख यांनी केले आहे.
सुतार ते वाहनचालक पदांसाठी १० वी पास पात्रता आहे तर डीटिपी ऑपरेटर पदासाठी १२ वी पास, मराठी व इंग्रजी टायपिंगचे ज्ञान आवश्यक आहे. सहायक लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर ही पात्रता असून संगणक हाताळण्याचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य राहील. तसेच सर्व पदांसाठी माजी सैनिक उमेदवारांस प्राधान्य असणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा मोबाईल क्रमांक 9767150477 अथवा 0240-2991370 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
