आंध्रप्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीत ९भाविकांचा मृत्यू, अनेक भाविक जखमी


हैदराबाद: आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील व्यंकटेश्वर मंदिरात भाविकांची चेंगराचेंगरी होऊन किमान ९ भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच तामिळनाडू आणि बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. आजच्या चेंगराचेंगरीमुळे दक्षिण भारत पुन्हा एकदा हादरून गेला आहे.
दरशनिवारी व्यंकटेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळते. त्यातच आज शनिवारी एकादशीच्या मुहूर्तावर या मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दी वाढली. लोक शिडीवरून चढून रेटारेटी करत मंदिरात जात होते. या रेटारेटी व गर्दीमुळेच ही चेंगराचेंगरी झाली असावी, असे सूत्रांनी सांगितले.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एम. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेत भाविकांचा मृत्यू ह्रदयद्रावक आहे. जखमींना जलद आणि योग्य उपचार मिळावेत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्यावर देखरेख करण्याची विनंती केली आहे, असे चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
काशीबुग्गा येथील व्यंकटेश्वर मंदिर १२ एकर परिसरात विस्तारलेले आहे. दूरदूरचे भाविक या मंदिरात दर्शनाला येतात. विशेषत: शनिवारी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या चेंगराचेंगरीनंतर अनेक भाविक जखमी होऊन जमिनीवर निपचित पडल्याचे पहायला मिळाले. इतर भाविकांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला तसेच तातडीने उपचासाठी रूग्णालयात नेण्यात मदत केली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!