नाशिकमध्ये ज्वेलर्सकडे सापडला २६ कोटींचा पाचशेच्या नोटांचा डोंगर, ९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता!


नाशिकः प्राप्तिकर विभागाने नाशिकमध्ये केलेल्या कारवाईत सुराणा ज्वेलर्स या सराफा व्यापाऱ्याकडे २६ कोटी रुपयांच्या नोटा आणि ९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे.  नागपूर आणि जळगाव प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्सवर धाड टाकून तब्बल ३० तास शोध मोहीम राबवली. जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना १४ तास लागले. या कारवाईमुळे सराफा व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. यापूर्वी १३ मे रोजी नांदेडमधील संजय भंडारी नावाच्या व्यावसायिकावर केलेल्या अशाच कारवाईत प्राप्तिकर विभागाने १७० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेवर टाच आणली होती. या कारवाईत १४ कोटींची रोख रक्कम आणि ८ किलो सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले होते. तब्बल ७२ तास ही कारवाई चालली होती. नांदेडमधील कारवाईनंतर आता नाशिकमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

शनिवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स आणि त्याच्याशी संबंधित रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयावार धाडी टाकल्या. या अधिकाऱ्यांच्या पथकाने दिवसभर आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, देवाण-घेवाणीचे व्यवहार, त्याच्याशी संबंधित दस्तऐवज तपासले. सलग ३० तास ही कारवाई सुरू होती. या ज्वेलर्सकडे तब्बल २६ कोटी रुपयांच्या ५०० च्या नोटा सापडल्या. ही रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना १४ तास लागले.

सुराणा ज्वेलर्सच्या मालकाचा राका कॉलनीमध्ये बंगला आहे. या बंगल्यावरही धाड टाकून स्वतंत्र पथकामार्फत शोध मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत सहभागी झालेल्या ५० ते ५५ अधिकाऱ्यांच्या पथकाने सुराणा ज्वेलर्स व त्याच्याशी संबंधित रिअल इस्टेट व्यवसायाची नाशिक शहरातील कार्यालये, खासगी लॉकर्स आणि बँकांमधील लॉकर्सही तपासणी केली. त्यांच्याशी संबंधित असलेल्या मनमाड आणि नांदगावमधील कुटुंबातील सदस्यांच्या घरीही प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम राबवली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!