कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय फसवा आणि धुळफेक करणारा, असे का म्हणाले प्रकाश आंबेडकर? वाचा सविस्तर…


मुंबईः कंत्राटी नोकर भरतीवरून राज्यातील युवकांत निर्माण झालेला असंतोष आगामी निवडणुकांत महागात पडण्याच्या भितीपोटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ‘कंत्राटी नोकर भरती हे महाविकास आघाडीचेच पाप’ असल्याचे सांगत कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला खरा, परंतु या घोषणेनंतरही शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारची ‘सुटका’ होण्याची चिन्हे दिसत नाहीत. विरोधकांनी सरकारला लक्ष्य करत टिकेची झोड उठवली असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय हा फसवा आणि धूळफेक करणारा असल्याचा आरोप केला आहे.

 राज्यातील अनेक विभागात बाह्यस्त्रोतांमार्फत कंत्राटी तत्वार नोकर भरती करण्याबाबतच्या जाहिराती शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारने प्रकाशित केल्या. जिल्हा परिषद, आरोग्य विभागासह शिक्षण विभागातही बाह्यस्त्रोतांमार्फत कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर राज्यातील युवकांमध्ये राज्य सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला.

या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. कंत्राटी नोकर भरतीच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होऊ लागली. राज्यातील युवकांमध्ये निर्माण होत असलेला हा असंतोष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत महागात पडू शकतो, याची जाणीव होताच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एकट्यानेच पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली. कंत्राटी नोकर भरती हे महाविकास आघाडीचेच पाप असल्याचा आरोप करत फडणवीसांनी ही घोषणा केल्यानंतर काँग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने भाजपसह शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारवर टिकेची झोड उठवली.

त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय हा धूळफेक करणारा असल्याचा आरोप केला आहे. कंत्राटी भरतीवर बोलताना फडणवीसांनी मूळ प्रश्न डावलला आहे. कंत्राटी भरती आम्ही रद्द करतो असे ते म्हणाले खरे, पण मग भरती करणार कशी?  याचा खुलासा केला का? तर नाही. म्हणजे हा जो निर्णय आहे तो धूळफेक करणारा आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

माझा सरकारला सवाल आहे की, ज्यांना कंत्राटी पद्धतीने पाच वर्षे किंवा त्याहून जास्त वर्षे झाली आहेत, त्यांना तुम्ही सरकारी नोकर का करत नाही?  त्यामुळे हा सगळा फसवा विषय आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

कंत्राटी नोकर भरतीवरून सरकारबाबत अपप्रचार केला जात आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्याबाबत विचारले असता, ‘माझे तर म्हणणे आहे की उपमुख्यमंत्रिपदही कंत्राटी पद्धतीने भरावे म्हणजे सरकारचा अपप्रचार होणार नाही’, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

कंत्राटी शुल्कही तातडीने परत कराः वडेट्टीवार

दरम्यान, राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरती पोटी राज्यातील युवकांकडून वसूल केलेले शुल्कही परत करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

काही पदांवर कंत्राटी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्याचे शुल्क प्रतिपरीक्षा एक हजार रुपये घेण्यात आले. काही उमेदवारांनी पाच-पाच पदांसाठी अर्ज केले. त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेण्यात आले होते. आता ती रक्कम उमेदवाराला तातडीने परत करावी, असे वडेट्टीवार म्हणाले.

 विद्यमान सरकारने चपराशीपदापासून ते अभियंतापदापर्यंतचे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जीआरमध्ये दुरूस्ती केली. ६ सप्टेंबर २०२३ रोजी महसूल विभागात तीन हजार, कृषी विभागात दोन हजार, पोलिस विभागात तीन हजार आणि आरोग्य विभागात तीन हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर काढला. जेव्हा ही जाहिरात प्रकाशित झाली, तेव्हा विरोधी पक्षाने विरोध केला आणि राज्यभरातील युवक रस्त्यावर आले. त्यामुळे सरकार हादरले आणि अखेर कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला, असे वडेट्टीवार म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!