शरद पवार- प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट, ‘कॉफी पे चर्चा’मुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण; नेमकी काय झाली चर्चा?


मुंबईः प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीचा विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत समावेश होणार की नाही? याबाबतचे चित्र अद्याप अस्पष्ट असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट घडून आली. या दोघांच्या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीमुळे ‘वंचित’चा ‘इंडिया’ आघाडी आणि महाविकास आघाडीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचेही बोलले जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शताब्दी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

या कार्यक्रमानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन प्रकाश आंबेडकर यांना शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य नेत्यांसोबत कॉफी घेण्याचा आग्रह केला. सुप्रिया सुळेंच्या आग्रहानंतर प्रकाश आंबेडकरांनी कॉफीचे निमंत्रण स्वीकारले आणि ही भेट झाली.

 शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेतले जाईल की नाही? याबाबतचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेत युती झाली असली तरी राज्यातील महाविकास आघाडीतही वंचितला अद्याप स्थान देण्यात आलेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात भेट झाली आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत सर्वांनाच उत्सुकता असताना स्वतः प्रकाश आंबेडकर यांनीच याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

‘शरद पवार यांच्याबरोबरच्या आजच्या भेटीत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीत सहभागी होण्याबाबत काहीच चर्चा झाली नाही. देशातील आगामी पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडेल, असे मला वाटत नाही,’ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी कॉफी घेण्याची विनंती केली. त्यावेळी शरद पवारही तेथे होते. आम्ही दहा ते बारा जण होतो. यावेळी आम्ही सर्वांनी मिळून कॉफी घेतली. आमची कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की, काँग्रेस कधीही बाळासाहेब आंबेडकर यांना इंडिया आघाडीत येऊ देणार नाही, याबाबत छेडले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ते मान्य आहे आणि माझा कायम भाजपला विरोध आहे, हेही त्यांनी लक्षात घ्यावे. काँग्रेस घेत नाही म्हणून मी त्यांच्याकडे येईल, अशी आस लावून ते बसले असतील तर त्यांना म्हणावे तुम्ही वाट बघत बसा, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दादाभाई नौरोजी यांनी त्याकाळी ब्रिटिशांवर एक आरोप केलाहोता की, तुम्ही सर्व आम्हाला लुटत आहात, पण दादाभाई नौरेजी यांनी त्यावेळेस केलेल्या आरोपांची व्यवस्थित मांडणी केली नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘प्रॉब्लेम ऑफ  रुपी’च्या माध्यमातून ब्रिटिश भारताला कसे लुटतात याची मांडणी केली. रुपयाची किंमत स्थिर राहिली तर देशातील गरिबाची आर्थिक स्थिती बदलू शकते. या पुस्तकाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मी वक्ता म्हणून उपस्थित होतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!