सूक्ष्मजीवशास्त्र आणि सूक्ष्मजीव
बहुतांश लोकांना मायक्रोबायोलॉजी म्हणजेच सूक्ष्मजीवशास्त्र हा शब्द माहिती नाही. त्या पार्श्वभूमीवर मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्मजीव आणि विविध क्षेत्रातील त्यांची भूमिका यावर प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न...
-प्रा. डॉ. भारती घुडे-वाडेकर
प्रत्येक मायक्रोबायोलॉजिस्टला सूक्ष्मजीवाबद्दल एक तथ्य माहित आहे, ‘जर सूक्ष्मजीव नसतील तर जीवन नाही’. जगभरात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. जे आपल्या जीवनात बदल घडवून आणतात. आपले अन्न सुरक्षित आहे याची खात्री करणे, रोगांवर उपचार करणे आणि प्रतिबंध करणे, हरित तंत्रज्ञान विकसित करणे किंवा हवामान बदलामध्ये सूक्ष्मजीवांच्या भूमिकेचा मागोवा घेणे इत्यादी बाबींवर ते निरंतर संशोधन-अध्ययन करत असतात.
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांनी सूक्ष्म जंतू समजून घेऊन अनेक महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांची उत्तरे देण्याचे ध्येय ठेवले आहे. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्...










