कुमार शिराळकरः स्वतःहून सामाजिक क्रांतीच्या प्रयोगाला वाहून टाकलेला शास्त्रज्ञ!


लोकशाही मूल्ये केवळ भाषणातच न मांडता स्वतःच्या जगण्यात प्रतिबिंबित केलेल्या १९७० च्या शहादा चळवळीतील लढाऊ कार्यकर्ता म्हणजे कॉम्रेड कुमार शिराळकर!शिराळकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखवणाऱ्या ‘कॉम्रेड कुमार शिराळकरः माणूसपणाच्या वाटेवरचा प्रवासी’या डॉ. उमाकांत राठोड यांनी संपादित केलेल्या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन रविवार, दिनांक ७ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) मसापच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होत आहे. त्यानिमित्त ज्येष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर यांनी या ग्रंथास लिहिलेली ही प्रस्तावना…

अजित अभ्यंकर, ज्येष्ठ कामगार नेते, पुणे.

आपल्या जवळच्या व्यक्तिच्या स्मृती जागवणे हा कोणत्याही माणसाचा अविभाज्य असा मानसिक अवकाश आहे. पण कुमार शिराळकर यांच्याबद्दल आज आपण त्यांच्या मृत्यूनंतर एक वर्षानी त्यांच्या स्मृती लिहतो आहोत, तो केवळ या सामान्य मानवी स्वभावाचा भाग नाही.

त्याचे कारण कुमार शिराळकर हा शेकडो श्रमिक शहरी-ग्रामीण-श्रमिक- आदिवासी-दलित यातील सर्व सामान्यांना आपला वाटणारा ‘असामान्य’ होता; आणि हेच कुमारचे वैशिष्ट्य समोर आणणारे हे पुस्तक आहे. हा केवळ स्मृती ग्रंथ नाही. कुमारच्या स्मृतीच आपल्या वाटेवरची दिशादर्शक चिन्हे आणि मानके असावी, असे मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली ही मनोगते आहेत.

 हे सर्वजण या शोषक व्यवस्थेला सुरुंग लावण्यासाठी काम करणारे जीवनदानी कार्यकर्ते आहेत. त्यांना या संघर्षात कुमार कसा दिसला, हेच ते आपल्याला सांगत आहेत. त्यामध्ये शहरी भागातून विचाराच्या क्षेत्रात ही लढाई करणाऱ्यांपासून ते प्रत्यक्ष आदिवासी भागातील वंचित कुटुंबातून शिकून पुन्हा तेथेच शिक्षण संस्थेची जबाबदारी घेणाऱ्यांपर्यंत सर्वजण आहेत. त्या सर्वांनी कुमारबद्दल जे लिहले आहे, त्यात आपल्याला विलक्षण समान असे सूत्र दिसते. ते आहे एका क्रांतिकारक आणि मूलभूत सामाजिक बदलासाठी झपाटलेल्या अशा व्यक्तित्वाचे.

मला कुमार शिराळकर हा एक स्वतःला स्वतःहून एका सामाजिक क्रांतीच्या प्रयोगाला वाहून टाकणारा एक ऋषी-शास्त्रज्ञ वाटतो. भवताल आणि मीपणा-अहंकार यातील भेद नष्ट झाल्यानेच अशी माणसे निर्माण होत असतात. पण तो भवतालाचे आकलन-विश्लेषण करून दीर्घकालीन वैचारिक निष्कर्ष काढणारा होता.

त्यांच्याबरोबर कित्येक वर्षे काम करणारे आदिवासी भागातील त्यांचे सहकारी कृष्णा ठाकरे लिहतात, ‘त्यांच्यात आम्हाला मार्क्स, गांधी आणि आंबेडकर तसेच खळखळून हसणारे मिश्किल व्यक्तित्व दिसायचे’. हे अत्यंत बोलके आणि हृदयस्पर्शी वाटते कारण त्यांच्या दैनंदिन अनुभवातून त्यांना झालेले दर्शन ते आपल्यासमोर मांडतात.

डॉ. अनंत फडके यांना ते स्फूर्तीस्थान वाटत होते. तसेच प्रसंगानुसार संयमाने किंवा आक्रमकपणे बरसणारा आतून परिपक्व असणारा कार्यकर्ताही त्यांना दिसत होता. शांताराम पंदेरे यांना त्यांच्या ९ वीच्या वयापासून त्यांच्याशी संवाद करणारा तो त्यांचा जेष्ठ मित्र- सहकारीच वाटत होता.

मला कुमार शिराळकर हा एक स्वतःला स्वतःहून एका सामाजिक क्रांतीच्या प्रयोगाला वाहून टाकणारा एक ऋषी-शास्त्रज्ञ वाटतो. भवताल आणि मीपणा-अहंकार यातील भेद नष्ट झाल्यानेच अशी माणसे निर्माण होत असतात. पण तो भवतालाचे आकलन-विश्लेषण करून दीर्घकालीन वैचारिक निष्कर्ष काढणारा होता.

शरीर, बुध्दी, भावना आणि इच्छा यांचे पूर्ण एकात्मता साधलेला हा माणूस होता. त्यामुळेच त्याच्या मार्क्सवादाला बौद्धिक आणि भावनिक असे स्वतंत्र कप्पे नव्हते. त्याची वर्गापार जाण्याची प्रेरणा आणि प्रक्रिया कृत्रिम नव्हती. पण हे करण्यासाठी त्याचे प्रयत्न निश्चितच होते.

 वैयक्तिक अहंकार, ईर्षा, स्पर्धा, किर्ती यांच्या पलीकडे गेलेला, परिस्थितीमध्ये झोकून स्वतःच्या शारीरिक समर्पणाला कायम तयार असणारा असा होता. भवतालाशी एकरूप होऊनदेखील स्वतःसहित भवतालाकडे एका साक्षीभावाने पाहणारा. हे डायलेक्टिक्स म्हणजे द्वंद्वाचे व्यवस्थापन उत्तमरितीने साधलेला, म्हणजेच मार्क्सवादाचे मर्म आत्मसात केलेला कार्यकर्ता!

शरीर, बुध्दी, भावना आणि इच्छा यांचे पूर्ण एकात्मता साधलेला हा माणूस होता. त्यामुळेच त्याच्या मार्क्सवादाला बौद्धिक आणि भावनिक असे स्वतंत्र कप्पे नव्हते. त्याची वर्गापार जाण्याची प्रेरणा आणि प्रक्रिया कृत्रिम नव्हती. पण हे करण्यासाठी त्याचे प्रयत्न निश्चितच होते. असणार. फरक फक्त इतकाच की, त्याला त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची, स्वतःशीच कराव्या लागणाऱ्या संघर्षाची वाच्यतादेखील तो करत नसे. त्या अर्थाने तो स्वयंभू होता.

वैयक्तिक अहंकार, ईर्षा, स्पर्धा, किर्ती यांच्या पलीकडे गेलेला, परिस्थितीमध्ये झोकून स्वतःच्या शारीरिक समर्पणाला कायम तयार असणारा असा होता. भवतालाशी एकरूप होऊनदेखील स्वतःसहित भवतालाकडे एका साक्षीभावाने पाहणारा. हे डायलेक्टिक्स म्हणजे द्वंद्वाचे व्यवस्थापन उत्तमरितीने साधलेला, म्हणजेच मार्क्सवादाचे मर्म आत्मसात केलेला कार्यकर्ता!

त्याच्या शाळेतील एक सोबती अनिल लिमये यांनी त्याच्या मृत्यूनंतर एका आदरांजली सभेत सांगितलेली आठवण मला त्याचे व्यक्तित्व समजावून घेण्यासाठी खूप महत्वाची वाटते. कुमार जेव्हा घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून नोकरी सोडून बाबा आमटे यांच्याकडे श्रमिक विद्यापीठात जावून राहिला, त्यावेळेस अनिल लिमये यांनी त्याला प्रश्न केला की, अशा चळवळीतून शोषणाच्या जखमेवर फक्त मलमपट्ट्या केल्या जातात. जखमेचे उच्चाटन नाही. मग तू तेथे का गेलास? त्यावर उत्तर देताना कुमारने सांगितले की, ‘आपल्या जवळ एसटीमध्ये कोणी गरीब, फाटका, घामेजलेला, दीनवाणा, अंगावर जखमा असणारा येवून बसला तर आपण अंग चोरतो. बाजूच्या सीटवर जाण्याचा विचार करतो. ही जी मनातील किळस किंवा उच्चभ्रूपणा आहे ना, तो घालवण्यासाठी तेथे गेलो. स्वतःचे शिक्षण करण्यासाठी!” हा होता कुमार.

इगो किंवा आत्मप्रौढीपणापासून पूर्णतः मुक्त असणारा. निगर्वी. बौद्धिक कार्य आणि शारीरिक श्रम यांचे तादात्म्य आपल्यामध्ये बाणविलेला मार्क्सवादी. म्हणूनच तो काहींना म. गांधींच्या रस्त्यावरचा प्रवासी वाटला. तर काहींना क्रांतीसज्ज असा क्रांतिकारक.

शेवटचा एक महत्वाचा मुद्दा. प्रश्न कुमारच्या गुणवर्णनाचा नसून आपण त्यातील काय आणि किती अंगी बाणवू शकतो, याचे आत्मपरिक्षण करण्याचा आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवण्याचा आहे. तीच खरी त्याला आदरांजली..!

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!