गुलजार….कवितेची बाग…!


डॉ.संजय शिंदे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

उर्दू भाषेत ‘गुलजार’ या शब्दाचा अर्थ होतो बगीचा, तोही  फुलांनी बहरलेला! हिंदी चित्रपटसृष्टीतील गुलजार हे एक प्रकारे कवितेच्या बागेत बहरलेलं व्यक्तिमत्व. तरल मनाच्या आणि अत्यंत संवेदनशील अशा या कवीला भारतीय साहित्यातील सर्वोत्तम पुरस्कार ‘ज्ञानपीठ’ घोषित करण्यात आला आहे . या कवीने ऑगस्टमध्ये वयाची ८७ वर्षे पूर्ण केली आहेत. या वयात व्यक्ती येते तेव्हा त्याने एक हजाराहून अधिक पोर्णिमा पाहिलेल्या असतात, असे म्हटले जाते. गुलजार यांनी मात्र अमावस्याही पाहिलेल्या. म्हणूनच तर ‘चौदहवी चांद को, फिर आग लगी है देखो..राख हो जायेगा जब, फिरसे अमावस होगी’ असं ते बोलून जातात. गुलजार यांच्या कविता, गजल, उर्दू शायरी ही रसिंकासाठी एक गुलजार अर्थात कवितेची बागचं असते.

गुलजार यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दमदार लिखाणासाठी ओळखले जाते. तर, उर्दूतील उत्कृष्ट कवींमध्ये गुलजार यांचे नाव आवर्जून घेतले जाते. यापूर्वी गुलजार यांना उर्दू साहित्य आणि हिंदी चित्रपटांमधील योगदानासाठी २००२ मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, २००४मध्ये पद्मभूषण आणि इतर पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते संपूर्णसिंह कालरा हे ‘गुलजार’ या नावाने प्रसिद्ध आहेत.

 गुलजार हे हिंदी चित्रपटांचे गीतकार, कवी, पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक, नाटककार आणि कवी आहेत. त्यांनी प्रामुख्याने हिंदी, उर्दू आणि पंजाबी भाषेत भरपूर साहित्य निर्मिती केली आहे. २००९मध्ये डॅनी बॉयल दिग्दर्शित ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील गुलजार लिखित ‘जय हो’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. या गाण्यासाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

गुलजार यांचा जन्म आज पाकिस्तानात असलेल्या पंजाबमधील झेलम जिल्ह्यातील दीना या गावचा. गुलज़ार(गुलजार) यांचे खरे नाव राम पूरणसिंह कालरा आहे. भारतातील एक कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अशा बहुमुखी प्रतिभेचे धनी. बहुतांशी लेखन उर्दू, पंजाबी अन काही प्रमाणात हिंदीत. चाहते मात्र काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत. अगदी जगात जिथे जिथे हिंदी सिनेमा अथवा सहित्य पोहोचले, अशा प्रत्येक ठिकाणी गुलजार यांना मानणारा रसिक आहे. गुलजार बोलतात आणि त्याची कविता बनते, असे म्हटले जाते. गेली ६० वर्षे भारतीय रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या अवलिया अर्थात आधुनिक ‘मिर्झा गालिब’ यांना भेटण्याची छत्रपती संभाजीनगर नगरवासीयांची आस २०१६ मध्ये पूर्णत्वास आली. 

उर्दू शायरीवर मीर, इक्बाल आणि गालिब या त्रिकुटाने अधिराज्य गाजविले. यातील एक शायर मिर्झा गालिब यांच्या जातकुळातील म्हणून गुलजार यांची ओळख आहे. पद्मभूषण, दादासाहेब फाळके, ऑस्कर, साहित्य अकादमी असे अनेक पुरस्कार या तरल मनाच्या कवीच्या नावावर आहेत. याहीपेक्षा मोठा पुरस्कार कोणता असेल तर तो गेली साडेपाच दशके रसिकांच्या मनावर त्यांनी गाजविलेल अधिराज्य! 

अत्यंत बेभरवशाच्या आणि नाटकी असलेल्या अशा फिल्मी दुनियेत राहूनही आपला साधेपणा जपणारा हा दिलदार माणूस. आपल्या साधेपणाचेही भांडवल केले जाणारा आजचा काळ. अशा वेळी प्रत्येक माणसाला भुरळ घालणारा हा कवी. आजपर्यंतचा त्यांचा हा प्रवास खूप कष्टाचा. तरीही कधी ते ‘शिकवा’ करीत नाहीत की कधी ‘गिला’. उलट ‘तेरा बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही’ असं म्हणतानाच ‘तेरे बिना जिंदगी, जिंदगी तो नही ‘ अशी प्रेयसीला आर्त हाकही ते मारत असतात.

आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत २०० हून अधिक चित्रपटांसाठी लिहिलेल्या त्यांच्या गीतांना जवळपास ४० संगीतकारांनी सुरबद्ध केलं आहे. दर दहा वर्षाला चित्रपट रसिकांची पिढी बदलत असते, असं म्हटले जाते. या अंगाने विचार केला तर गुलजार यांनी पाच पिढ्यांच मन रिझवलं, असं नक्की म्हणता येईल. साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण, ऑस्कर (जय हो – स्लमडॉग मिलीनेअरमधील  गीतलेखनासाठी) आणि भारतीय सिनेसृष्टीतील दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार गुलजार यांच्या नावावर नोंदले गेले. 

  कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक, पटकथाकर, संवादलेखक, नाटककार अन अत्यंत संवदनशील माणूस असं अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजेच गुलजार.  त्यांनी आणखी कितीही लिहावं, असं आपल्याला वाटत राहत. गुलजार यांच्या गीतांमध्ये ठिकठिकाणी ज्या सामान्यतः गीतांमध्ये वापरल्या जात नाहीत, अश्या प्रतिमा वापरलेल्या आढळतात. उदाहरण सांगायचं झालं तर ‘सत्या’ मधील अतिशय लोकप्रिय गीत ‘सपने में मिलती हैं’ हे गीत नावीन्यपूर्ण प्रतिमा वापरून अगदी हृदयंगम झाले आहे. यातील ‘सारा दिन सडकों पे खाली रिक्षे सा पीछे पीछे फिरता हैं’ ही ओळ तर कमालच.

१९६१ सालच्या ‘बंदिनी’मधील ‘मोरा गोरा रंग लेले, मोहे शाम रंग देदे’ या गाण्यापासून ते चालू वर्षात प्रदर्शित ‘डेढ ईश्किया’पर्यंत शेकडो गाणी त्यांनी लिहिली. ‘ईश्कीया’ मधील ‘दिल तो बच्चा है जी’ अशी तसेच ‘जंगल जंगल पत चला है, चड्डी पहेनके फुल खिला है’ असं लहान मुलांसाठी लोकप्रिय गाणही त्यांनी लिहिलं. इतकंच नाही तर बिग बी अर्थात अमिताभने धम्माल नाच केलेल्या ‘कजरा रे कजरा रे’ असं उडत्या चालीचं गाणही त्यांचचं. ‘इतकं नाजूक लिहणारा हा कवी 

‘मै सोचता हूं उस वक्त अगर 

कागज पे लिखी

एक नज्म कही उडते उडते

सुरज पे गिरे 

तो सुरज फिरसे जलने लगे’

 असं टोकदार ही लिहित असतो. कोट्यवधी वर्षांची सूर्याची आग जेव्हा विझेल अन राख उडू लागेल, मंदशा राखाडी उजेडात पृथ्वीचा हा तुकडा भिरभिरत जाईल तेव्हा… हा आहे गुलजार यांच्यामधील कवीचा चिरंतन आशावाद!

अशा या कवीच्या गीतांना आर. डी. बर्मन, भूपेन हजारिका यांच्यापासून ते नव्या पिढीतील ए. आर. रहेमान यांच्यापर्यंत अनेक संगीतकारांनी सूर दिला. ‘छोड आये हम ओ गलिया, तुम आ गये हो, मुसफिर हूं यारो, हुजूर इस कदर इतराके चलिये’ या सारखी शेकडो गीत अजरामर ठरली. ‘इजाजत’मधील ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है’ व ‘आंधी’मधील ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही ‘ अशा अविस्मरणीय गाणी लिहिणाऱ्या या गीतकाराचे आभाळाएवढी उंची गाठूनही पाय  ‘जमींपर’च आहेत. 

अभिनेत्री राखी यांच्यासोबतच संसार मात्र अखेरपर्यंत टिकला नाही. इतकं तरल लिहिणाऱ्या आणि संवेदनशील राखीच्या संसाराला माहित नाही कोणाची दृष्ट लागली. मेघना उर्फ बोस्की हे एकमेव फुल मात्र या वेलीवर फुललं. तिच्याच नावाने असणाऱ्या ‘बास्कियाना’त या बापलेकीचा रहिवास आहे. काही दिवसापूर्वी पाकिस्तानात शंभराहून अधिक बालकांचे जीव घेण्याची तालिबानी वृत्ती, गुलजार यांच्या मनावर घाव घालते. त्यांनी आपल्या फेसबुकवर या घटनेनंतर लिहीलेल्या ओळी.…

अपनी मर्जी से तो मजहब भी नहीं उसने चुना था,

उसका मज़हब था जो माँ बाप से ही उसने

विरासत में लिया था

अपने माँ बाप चुने कोई ये मुमकीन ही कहाँ है

मुल्क में मर्ज़ी थी उसकी,  न वतन उसकी रजा से

वो तो कुल नौ ही बरस का था उसे क्यों चुनकर,

फिरकादाराना फसादात ने कल कत्ल किया…

मनातील वेदनेला अशा शेकडो गीतांमधून मोकळी वाट करून देणाऱ्या या कवीकडून जर तरल भाव घेत आला तर त्यांची ‘मन की बात’ आपली ‘दिल के साथ’ जोडली गेली असं म्हणता येईल. नाही तर गुलजार साहेब यांच्या चिरंतन आशावादाचे काही कण पडूनही आपली झोळी रिकामीच राहिली, असं म्हणाव लागेल.  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!