समृद्धी महामार्गः जितका प्रवास तितकाच पथकर!


नागपूर ते मुंबई ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार ११ डिसेंबर रोजी नागपुरात होत आहे. त्यानिमित्ताने या मार्गावरील पथकराविषयीची माहिती देणारा हा विशेष लेख…

समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना सर्वसामान्य नागरिकांना अधिकचा पथकर लागेल, असा गैरसमज निर्माण होऊ शकतो. मात्र, यातील वस्तुस्थिती अशी आहे की, जेवढा तुम्ही प्रवास कराल, तेवढाच तुम्हाला पथकर भरावा लागणार आहे.

समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे निर्गमन पथकर (एक्झिट टोल). निर्गमन पथकर म्हणजे काय?, तर निर्गमन पथकर म्हणजे बाहेर पडताना देता येणारा कर… याचाच अर्थ तुम्ही जितके अंतर या मार्गावरुन कापले, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतील. समृद्धी महामार्गाने नागपूर ते मलकापूर असा प्रवास केला, तर मलकापूरपर्यंत जितके अंतर होईल, तितकाच पथकर तुम्हाला द्यावा लागेल, तुमच्याकडून मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा पथकर वसूल केला जाणार नाही.

पहिल्या टप्प्यात (नागपूर ते शिर्डी) मुख्य मार्गिकेवर फक्त वायफळ येथे पथकर नाका असणार आहे. इतर इंटरचेंजेस धरून एकूण १९ नाके आहेत. निर्गमन पथकर पद्धतीनुसार समृद्धी महामार्गावर जेवढ्या अंतराचा प्रवास होईल, तेवढाच पथकर आकारण्यात येणार असल्याने सद्य:स्थितीत नागपूर ते शिर्डी हलक्या वाहनांकरिता सुमारे ९०० रुपये एवढा पथकर असेल. पथकर हा फास्ट टॅग, कार्ड, वॅालेट, रोख अथवा ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

आपत्कालीन व्यवस्थाः महामार्गावर अपघात किंवा बिघाड झाल्यास हेल्पलाईन 1800-2332233, 8181818155 या  क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधता येईल. महामार्गावर ठिकठिकाणी हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित करण्यात येतील. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरीता १०८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. १५ रुग्णवाहिका, १५ शीघ्र प्रतिसाद वाहने, १२२ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

उद्घाटनानंतर समृद्धी महामार्ग सर्वांसाठी खुला होईल. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रवास करावा, द्रुतगती महामार्गावर कुठेही वाहने उभी करू नयेत, सीट बेल्टचा वापर करावा, वेग मर्यादेचे पालन करुन वाहनधारकांनी सुरक्षित व गतिमान प्रवासाचा आनंद घ्यावा!

जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!