गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकः भाजपची सत्ता राहणार की सत्तांतर होणार? आज फैसला!


नवी दिल्लीः  गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपची सत्ता कायम राहणार की तेथील सरकार बदलणार? गुरूवारी येणाऱ्या निवडणूक निकालानंतर हे स्पष्ट होऊन जाईल. दोन टप्प्यात झालेल्या गुजरात विधानसभा आणि एक टप्प्यात झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी होणार आहे. त्याचबरोबर विविध विधानसभेच्या ६ आणि लोकसभेच्या एका जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही गुरूवारीच होईल. सायंकाळी उशिरापर्यंत या मतमोजणीचे निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे.

सर्वांचेच लक्ष गुजरातकडेः सर्वांचे लक्ष लागले आहे ते गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी मतदान घेण्यात आले. येथे दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ८९ आणि दुसऱ्या टप्प्यात ४३ जिल्ह्यातील ९३ मतदारसंघात मतदारांनी मतदानचा हक्क बजावला.

या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे भवितव्याचा मतदारांनी नेमका कोणता फैसला केला? हे गुरूवारी स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घाटलोडियामधून, हार्दिक पटेल यांनी वीरमगाममधून, अल्पेश ठाकोर यांनी गांधीनगर दक्षिण, काँग्रेसचे महेंद्रसिंह बयाडमधून, भाजपचे चंद्रसिंह राऊलजी गोध्रामधून, काँग्रेसचे जिग्नेश मेवाणी वडगाममधून, भाजपचे कांतिलाल अमृतिया मोरबीमधून, भाजपचे रिवाबा जडेजा जामनगर उत्तर मधून, आपचे ईसुदान गढवी खंभालियामधून तर काँग्रेसचे अर्जुन मोढवाडिया हे पोरबंदरमधून आपले भवितव्य अजमावून पहात आहेत.

एक्झिट पोलच्या अंदाजाचा फुगा फुटणार?: २७ वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला यावेळी काँग्रेसबरोबच आपकडूनही कडवे आव्हान मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा हा रणसंग्राम त्रिशंकू संघर्षात बदलून जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु मतदानानंतर जाहीर झालेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजप बहुमताने विजयी होईल, असे दावे करण्यात आले आहेत.

काही एक्झिट पोलच्या निष्कर्षात भाजपला १२५ ते १३० तर काँग्रेसला ४० ते ५० आणि आपला ३ ते ५  जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये भाजपला १३१ ते १५१ आणि काँग्रेसला ६० ते ३० जागा आणि आपला ९ ते २१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजाचा हा फुगा फुटणार की कसे? याचाही फैसला गुरूवारीच होणार आहे.

हिमाचल प्रदेशः हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकालही गुरूवारीच जाहीर होतील. येथे निवडणूक प्रचारात भाजप आणि काँग्रेस पूर्ण ताकद पणाला लावली होती. भाजपकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही या छोट्याशा राज्यात निवडणूक प्रचारासाठी तळ ठोकून होते. काँग्रेसकडून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.

६८ सदस्य संख्या असलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. भाजपचे जयराम ठाकूर सिराजमधून, विक्रमादित्य सिंह शिमला ग्रामीणमधून, काँग्रेसचे मुकेश अग्निहोत्री हरौलीमधून, काँग्रेसचे कुलदीपसिंह राठौर ठियोगमधून, काँग्रेसचे सुखविंदरसिंह सुक्खू नादौनमधून, भाजपचे सुरेश भारद्वाज कुसुम्पटीमधून, भाजपचे राजीव सैजल कसौलीमधून आणि भाजपचे सुखराम चौधरी हे पावंटा साहिबमधून निवडणूक मैदानात आहेत.

काँग्रेसची बाजी?: हिमाचल प्रदेशातील ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबरला मतदान घेण्यात आले होते. राज्यात सरासरी ७६ टक्के मतदान झाले होते. २०१७ मध्ये भाजपने ४४ जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला होता तर काँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. एक्झिट पोलच्या अंदाजात येथे काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची लढत दाखवण्यात आली आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपला जास्त जागा दाखवण्यात आल्या आहेत तर एका एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परंतु येथे काँग्रेस बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!