उदगीरकर तरूणांना हवे महाराष्ट्रातील पहिल्या दुध भुकटी प्रकल्पाचे पुनरूज्जीवन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठोस निर्णयाची अपेक्षा!


लातूरः मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागात वसलेल्या उदगीर येथील महाराष्ट्रातील पहिला दुध भुकटी प्रकल्प राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे बंद पडला असून उदगीर आणि परिसरातील डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना कधीकाळी सोन्याचे दिवस पहायला लावणाऱ्या या प्रकल्पाचे पुनरूज्जीवन करावे, अशी आग्रही मागणी उदगीर तालुक्यातील तरूणांनी केली असून मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या पुनरूज्जीवनाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

१९७८ मध्ये मंजुरी मिळून १९७९ मध्ये कार्यान्वित झालेली उदगीरची दूध योजना दररोज साधारण दीड लाख लिटर दुधावर प्रक्रिया करत होती. महाराष्ट्रातील हा पहिला दूधभुकटी प्रकल्प होता. या प्रकल्पाच्या वैभवाच्या काळात उदगीर आणि परिसरातील डोंगराळ भागात दुग्धउत्पादन आणि संकलन करणारे एक मोठे जाळे निर्माण झाले होते. मराठवाड्यातील या दुष्काळी भागात शेतकऱ्यांना या प्रकल्पाने सोन्याचे दिवस आले परंतु दुर्दैवाने या धवलक्रांतीला ग्रहण लागले आणि २०१५ शासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प बंद झाला.

कधीकाळी परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात हा प्रकल्प वरदान ठरत होता. ४५० कायम व १८० रोजंदारी कर्मचाऱ्यांना थेट रोजगार देणारा हा प्रकल्प पुनर्जीवित करावा या मागणीसाठी उदगीरकर शासकीय दूध योजना पुनरूज्जीवन समितीच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत.

उदगीर येथे खाजगी दूध संकलन करणाऱ्या कंपन्या आजही ७० ते ८० हजार लिटर दुधाचे संकलन करत आहेत. उदगीर येथे शासकीय पशु वैद्यक महाविद्यालय आहे. त्याच बरोबरीने दुग्धशास्त्र महाविद्यालयही आहे. या भागात सकस चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे पशुपालन आणि दुग्धविकासाच्या दृष्टीने इथली भौगोलिक परिस्थिती अत्यंत पोषक आहे.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री व उदगीरचे आमदार संजय बनसोडे, राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रालयात भेट घेत निवेदन दिले. त्यांनी कुठलीही दूध योजना राज्य सरकार चालावण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. परंतु हा प्रकल्प शासनानेच चालवावा या भूमिकेवर उदगीरकर ठाम आहेत. समितीच्या आग्रहाखातर ही योजना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नाने एनडीडीबीमार्फत चालू करावी अशी आग्रही मागणी उदगीरकर तरूणांनी केली आहे.

महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर असलेला व विकासापासून कोसो दूर असलेला उदगीर तालुक्याने दुध आणि दुध भुकटी प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पटलावर आपले स्थान निर्माण केले होते. या भागातील भौगोलिक स्थिती पाहता शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून या तालुक्याची प्रगती साध्य करता येऊ शकते.

शेतीपुरक जोडधंदा म्हणून दुध उत्पादनाकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे, असा उदगीरकर तरूणांचा आग्रह आहे. त्यासाठी समितीने दिल्ली येथे नितीन गडकरी आणि खासदार सुधाकर शृंगारे तथा दुध विकास सचिव यांची भेट घेतली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून अविरतपणे या लोकाभिमुख मागणीसाठी समिती अहोरात्र प्रयत्न करत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या पुनरूज्जीवनाबाबत ठोस निर्णयाची अपेक्षा उदगीरकरांना आहे.

उदगीर येथील महाराष्ट्रातील पहिल्या दुध भुकटी प्रकल्पाचे पुनरूज्जीवन करण्यात यावे यासाठी शासकीय दूध योजना पुनरूज्जीवन समितीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि एनडीडीबीमार्फत हा प्रकल्प सुरू करण्याचा आग्रह धरला.

पुनरूज्जीवनासाठी हवेत १३ कोटी रुपये!

तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७८ मध्ये उदगीर येथील शासकीय दुध भुकटी प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. १९ जानेवारी १९७९ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. जून २००२ पर्यंत हा प्रकल्प सुरू होता. त्यानंतर शासकीय उदासीनतेमुळे हा प्रकल्प बंद पडला. नोव्हेंबर २००८ मध्ये तत्कालीन आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या प्रकल्पाचे पुनरूज्जीवन केले होते. मात्र त्यानंतर हा प्रकल्प पुन्हा बंद पडला. तो अद्यापर्यंत चालूच झाला नाही. या प्रकल्पाच्या नव्याने पुनरूज्जीवनासाठी समितीने १३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नाही.

११ तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रकल्पाचा लाभ

या दुध भुकटी प्रकल्पाची क्षमता दररोज १ लाख २० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची होती. प्रकल्पाच्या ६० किलोमीटर परिसरातील अंबाजोगाई, गंगाखेड, भूम, परंडा, कळंब, अहमदपूर, लोहा, निलंगा, परभणी, उस्मानाबाद (धाराशिव), उमरगा आदी ठिकाणचे थंड केलेले कच्चे दुध या दुध भुकटी प्रकल्पासाठी येत होते. या दुध भुकटी प्रकल्पातून तयार झालेली दुध भुकटी व पांढरे लोणी देशातील विविध भागात विकले जात होते. यातून राज्य सरकारला चांगले उत्पन्न मिळत होते.

उदगीर शासकीय दुध योजना पुनरूज्जीवन समितीने क्रीडा व युवक कल्याणमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या पुनरूज्जीवनाचा आग्रह धरला. मात्र त्यांनी आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोणतीही दुध योजना चालवण्यास सरकार असमर्थ असल्याचे सांगितले. तरीही समितीचा संघर्ष सुरूच आहे.

प्रकल्प भंगारात काढून विकण्याच्या हालचाली

राज्य सरकारने १३ एकर जागेवर दोन कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प सुरू केला होता. तब्बल २४ वर्षे उत्तम प्रकारे चालला. २००२ ते २००८ या काळात हा प्रकल्प बंद पडलेला होता. २००८ मध्ये या प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीसाठी २ कोटी ५९ लाख रुपये खर्च करून या प्रकल्पाचे नूतनीकरण करण्यात आले होते. डिसेंबर २०१४ ते ७ ऑगस्ट २०१५ पर्यंत दुध भुकटी प्रकल्प सुरू होता. मात्र ऑगस्ट २०१५ मध्ये बॉयलरमध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे तो बंद पडला तो आजपर्यंत बंदच आहे. आता हा प्रकल्प भंगारात काढून विकण्याच्या हालचाली सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एका कंपनीमार्फत या प्रकल्पातील मशिनरीचे मूल्यांकन करण्यात आले असून त्याची माहितीही राज्य सरकारकडे पाठवण्यात आली आहे. मात्र हा प्रकल्प मोडित काढण्यास उदगीरकरांचा विरोध आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *