
मुंबई: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात विविध आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांची सेवाकाळात एक वेळची बाब म्हणून बदली करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. यानुसार २३ ते २५ जून या कालवधीत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या करण्यात येणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील आरोग्य उपकेंद्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नेमणूक झालेले समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. गेली काही वर्ष समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांकडून विनंती बदली करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती.
तृतीयस्तरीय आरोग्य व्यवस्था बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने एक वेळची बाब म्हणून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक निर्णय घेत सेवाकालातील एक वेळची बाब म्हणून राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची बदली धोरणास मान्यता दिली आहे.
सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या पसंतीच्या जिल्ह्यात बदलीसाठी विनंती करता येणार आहे. आंतरजिल्हा बदली संचालक-१ आरोग्य सेवा, मुंबई यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. आंतरजिल्हा बदलीकरिता इच्छुक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून १२ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात येणार असून प्राप्त अर्जांची छाणनी १३ ते १९ जूनपर्यंत होणार आहे.
बदली पात्र समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची यादी २० जून रोजी आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. २३ ते २५ जून या कालावधीत विनंती बदली संदर्भाने समुपदेशन आयोजित करण्यात येणार आहे. समुपदेशनानंतर बदली करण्यात आलेल्या समुदाय अधिकाऱ्यांना ७ जुलैपर्यंत रुजू होण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.
जिल्हा अंतर्गत बदली करण्याकरिता शासनामार्फत सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार बदली प्रक्रियेसंदर्भाने समिती स्थापन करण्याबाबतच्या सूचना जिल्ह्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होणार असून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिक लोकाभिमुख सेवा मिळणार असल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.
