राज्याच्या ‘या’ भाग आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता


मुंबईः महाराष्ट्रात यंदा दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, दक्षिण छत्तीगड आणि दक्षिण ओडिशाच्या काही भागांमध्ये आणखी पुढे सरकरला आहे. पुढील दोन-तीन दिवसात मान्सून मध्य अरबी समुद्र, मुंबईसह महाराष्ट्राचा काही भाग आणि तेलंगणामध्ये आणखी पुढे जाण्यास अनुकुल परिस्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राने आज (१० जून) आणि उद्या (११ जून) रोजी महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि मराठावाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे.

१० जूनः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी या अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर, मुंबई, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी, बीड,  हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे.

११ जूनः  रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, अहमदनगर, कोल्हापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटासह मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!