वैजापुरातील रोहित पठारेंच्या हत्त्येला पोलिसच जबाबदारः माजी गृह राज्यमंत्री नितीन राऊत यांचा गंभीर आरोप, मस्साजोग हत्याकांडाप्रमाणे सरकार गांभीर्य का दाखवत नाही?


छत्रपती संभाजीनगर: वैजापूर येथील रोहित पठारे या दलित युवकाच्या हत्त्येला वैजापूर पोलीसच जबाबदार आहेत. तीन ते चार दिवस हा प्रकार सुरू असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. असे असतानाही आतापर्यंत एकही पोलीस निलंबित करण्यात आला नाही, असा गंभीर आरोप माजी गृह राज्यमंत्री काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी केला. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गांभीर्य दाखवणारे राज्य सरकार रोहित पठारेंच्या हत्या प्रकरणात गांभीर्य का दाखवत नाही? रोहितच्या हत्या प्रकरणाला जबाबदार असलेला एकही पोलिस अजून का निलंबित झाला नाही?, असे सवालही त्यांनी केले.

आ. राऊत यांनी गुरुवारी वैजापूर येथे जाऊन रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले.

रोहित पठारे यांना घरातून केस पकडून फरफटत बाहेर काढण्यात आले. मारहाण करत चौकाचौकांत फिरवण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत असताना त्यांनी पाणी मागितले, मात्र त्यांना पाणी न देता त्यांच्या तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असतानाही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. इतकेच नव्हे तर रोहित यांची पत्नी त्यांना वाचवण्यासाठी मध्ये आली असता तिच्या पोटात लाथा मारण्यात आल्या. त्यांचे वडील अनिल यांनाही मारहाण करण्यात आली, तर लहान भावाच्या डोक्याला अनेक टाके पडले आहेत. हा सर्व प्रकार अत्यंत अमानुष असल्याचे आ. राऊत म्हणाले.

रोहित पठारे हे गरीब मात्र स्वाभिमानी कुटुंबातील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. कोणावर अन्याय झाला तर मदतीसाठी धावून जाणाऱ्या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पठारे यांची अशा प्रकारे हत्या होणे हे अत्यंत घातक असल्याचे आ. राऊत म्हणाले.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा. गुन्ह्याची तातडीने नोंद घेऊन दोषारोपपत्र दाखल करावे आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात हा खटला चालवण्याचे निर्देश द्यावेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारने जितकी गंभीर भूमिका घेतली, तेवढे गांभीर्य रोहित पठारे हत्या प्रकरणात दिसत नाही. वैजापूर परिसरात अवैध धंदे सुरू असतानाही त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप आ. राऊत यांनी केला.

…तर राज्यभर आंदोलन

रोहित पठारे हत्या प्रकरणात योग्य न्याय मिळाला नाही, तर राज्यभरातील दलित आणि आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. हे आंदोलन फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर आधारित असेल, असा इशाराही राऊत यांनी दिला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष सय्यद अक्रम, विजय वाहूळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!