मंत्रालयात आता फक्त ऑनलाईन ॲपद्वारेच मिळणार प्रवेश, नव्या प्रणालीने कसा मिळवायचा प्रवेश? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया


मुंबई: मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळखआधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली. टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे.  त्यामुळे यापुढे मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना कोणत्याही कामाकरिता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.

अभ्यांगतांना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे. केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मजल्यावरच प्रवेश करावा लागणार आहे. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास अभ्यागतावर कारवाई केली जाणार आहे. अभ्यागतांना संबंधित विभागातील आपले काम पूर्ण झाल्यावर विहीत वेळेत मंत्रालयातून बाहेर पडावे लागणार आहे.

ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग अभ्यागतांना रांगेत उभे राहण्यामुळे होणारा त्रास विचारात घेता त्यांना दुपारी १२ वाजता प्रवेश देण्यात येईल. तर दुपारी १२ नंतर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यांगत यांचेसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था राहील. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यांगत यांनी तत्संबंधीचे वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.

मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना दुपारी २ वाजेनंतर प्रवेश देण्यात येईल. अशा प्रवेशासाठी त्यांना डिजीप्रवेश या ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळवता येईल. अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. अशिक्षीत तसेच स्मार्टफोन नसलेल्या अभ्यांताकरीता गार्डन गेट येथे ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश नोंदणीकरीता तसेच मदतीकरीता एक खिडकी उपलब्ध असणार आहे.

‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे आपली नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यूआर कोड आधारे मंत्रालयाबाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशाकरिता आरएफआयडी कार्ड वितरीत करण्यात येईल. या आरएफआयडी कार्ड आधारे सुरक्षाविषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल. अभ्यागतांना आरएफआयडी प्रवेश ओळखपत्र परिधान करणे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक राहील.

अभ्यागतांनी नोंदणी कशी करायची?

‘डिजीप्रवेश’ ॲप हे मोबाईल ॲप ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईलच्या प्रणालीनुसार ॲण्ड्राईडमध्ये गुगल प्ले स्टोअरवर तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर digi pravesh हे सर्च केल्यास हे ॲप विनामूल्य डाऊनलोड करता येते.

या ॲपवर सुरूवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारित यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनीटांपेक्षा कमी कालावधी लागतो.

अशी असेल प्रक्रिया

  • डीजी प्रवेश ऍप अँड्रॉइड फोनधारकांनी गुगल प्ले स्टोअरवरून तर आयओएस फोनधारकांनी ऍपल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावा.
  • ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर केवळ एकाच वेळी नोंदणी करावी लागेल.
  • आधार कार्ड आधारित चेहरा ओळख प्रणालीच्या (फेस रिकग्निशन सिस्टीम) माध्यमातून नोंदणी पूर्ण होईल.
  • नोंदणी पूर्म झाल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्या विभागाचा स्लॉट बुक करा.
  • नोंदणीनंतर क्यूआर कोड मिळेल, हा क्यूआर कोड मंत्रालयाच्या प्रवेश काऊंटरवर स्कॅन करावा लागेल.
  • त्यानंतर प्रवेशासाठी आरएफआयडी कार्ड जारी केले जाईल, जे मंत्रालयात प्रवेशासाठी अनिवार्य असेल.
  • सुरक्षा तपासणी केल्यानंतरच मंत्रालयात प्रवेश दिला जाईल.
  • मंत्रालयातून बाहेर पडताना आरएफआयडी कार्ड सुरक्षा रक्षकांकडे जमा करणे बंधनकारक असेल.
  • ही संपूर्ण प्रक्रिया केवळ तीन मिनिटांपेक्षाही कमी वेळेत पूर्ण होईल आणि लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज न पडता मंत्रालयात प्रवेश मिळवता येईल.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!