खा. नवनीत राणांना अटक होणार? महानगर दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले अजामीनपात्र वॉरंटवर कारवाईचे आदेश

मुंबईः बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी विशेष न्यायालयाने दोषमुक्तती देण्यास नकार दिल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. जातप्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी शिवडीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ डिसेंबरपर्यंत स्थगीत करण्यात आली आहे.

बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी विशेष न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने दोषमुक्ततेसाठीची विनंती फेटाळून लावली आहे. तसेच शिवडीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटवर स्थगिती देण्यासही नकार दिला आहे.

शिवडीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध दोनवेळा अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. तरीही राणा आणि त्यांचे वडिलमहानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहिले नव्हते. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर रहावेच लागेल, असा आदेश विशेष न्यायालयाने बुधवारी दिला.

 राणा आणि त्यांच्या वडिलांनी  बनावट जातप्रमाणपत्र मिळवले हे दर्शवणारे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत, असे मत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिलासा नाकारताना नोंदवले. साक्षीदारांच्या जबाबासह कागदपत्रे पाहिली तर राणा आणि त्यांच्या वडिलांनी गुन्हा केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते, असे मतही न्या. रोकडे यांनी नोंदवले होते.

विशेष न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर शिवडीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी अजामीनपात्र वॉरंटवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर अटकेची टांगती तलवार आहे. नवनीत राणा या ज्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत, ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती.

 राणा यांनी बनावट जातप्रमाणपत्र मिळवून ही निवडूक लढवल्याचा आरोप आहे. शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे त्यांनी बनावट जातप्रमाणपत्र मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!