नवी दिल्लीः जे. पी. नड्डा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे भाजप म्हणजेच मोदी-शाह पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या शोधात आहेत. पक्षाध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या नावांपैकी बहुतांश नेते केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यामुळे आता पक्षाचे महासचिव विनोद तावडे आणि राज्य महासचिव (संघटन) यांची नावे चर्चेत आली आहेत. विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागल्यास महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मागील दोन कार्यकाळापासून राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीत भाजपने एक विशिष्ट व्यवस्था अंगीकारल्याचे पहायला मिळते. २०१४ मध्ये भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह केंद्रीय मंत्री बनले आणि त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा अमित शाह यांच्याकडे सोपवली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या आग्रहाखातरच अमित शाह यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली होती.
२०१९ मध्ये अमित शाह केंद्रीय गृहमंत्री बनल्यानंतर जून २०१९ मध्ये जे. पी. नड्डा यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जानेवारी २०२० मध्ये ते मोदी-शाह यांच्या आशीर्वादामुळे भाजपचे पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष बनले. यावर्षीच्या जानेवारी महिन्यात त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला तरी मोदी-शाह यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावर कोणाचीही नियुक्ती केली नाही.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जी नावे चर्चेत होती, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भपेंद्र यादव यासारख्या नेत्यांची नावे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. आता हे सर्वच जण केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यामुळे त्यांच्यापैकी कोणाचीही राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता धुसर झाली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचा नेमायचा असला तरी निर्णय मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाच घ्यावयाचा आहे. आता भाजप पक्ष संघटनेमधून या पदासाठी पक्षाचे महासचिव विनोद तावडे आणि सुनील बन्सल यांची नावे चर्चेत आली आहेत. हे दोघेही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे विश्वासू नेते मानले जातात.
विनोद तावडे हे महाराष्ट्रातील नेते असून राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्याआधी ते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. सध्या ते बिहारचे प्रभारी महासचिव आहेत. भाजपच्या लोकसभा निवडणूक मोहिमेत त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांना आरएसएसमधून भाजपमध्ये आणण्यात आले खरे, परंतु ते आता ते पूर्णतः भाजपसाठी समर्पित झालेले आहेत.
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले दुसरे नाव आहे सुनिल बन्सल यांचे. राज्य महासचिव (संघठन) रुपाने भाजपसाठी उत्तर प्रदेशचे नेतृत्व केल्यानंतर प्रामुख्याने बन्सल यांच्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. बन्सल यंच्यावर उत्तर प्रदेशनंतर पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणचे प्रभारी महासचिव म्हणून राष्ट्रीय जबाबदारी सोपवण्यात आली.
बन्सल यांनी लोकसभा मोहिमेत भाजपचे देशभरातील कॉल सेंटर्स सांभाळले, फीडबॅकचे एकत्रिकरण केले आणि तळागाळातील पक्ष कार्यकर्त्यांना प्रेरित केले. बन्सल यांनी अगदी बारकाईने काम करणारा नेता अशी आपली ओळख निर्माण करत भाजप पक्षश्रेष्ठी म्हणजेच नरेंद्र मोदी- अमित शाह यांचा विश्वास संपादन केला आहे.
२०१४ मध्ये भाजप संघठनावर पूर्णतः ताबा मिळवल्यानंतर मोदी-शाह आता पक्षावरील आपली पकड सैल होऊ देऊ इच्छित नाहीत. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर ते आपल्याच खास मर्जीतील कोणाला तरी बसवू इच्छितात. त्यामुळेच विनोद तावडे आणि सुनील बन्सल या मोदी-शाह यांच्या विश्वासातील दोन नेत्यांची नावे पुढे आली आहेत. नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध पूर्ण होईपर्यंत मोदी-शाह हे जे.पी. नड्डा यांनाच पक्षाचे काम पहायला सांगू शकतात, अशीही शक्यता आहे.
तावडेंची वर्णी फडणवीसांसाठी अडचणीची?
महाराष्ट्रात भाजप पक्ष संघटनेवर देवेंद्र फडणवीस यांचा ताबा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी अनेक महत्वाच्या नेत्यांची तिकिटे कापली होती. त्यात विनोद तावडे यांचाही समावेश होता. त्यानंतर विनोद तावडे यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय महासचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि ते राष्ट्रीय राजकारणात गेले. महाराष्ट्राच्या राजकारणातून अनिच्छेने राष्ट्रीय राजकारणात गेलेले विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागली तर देवेंद्र फडणवीसांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
फडणवीसांनी महाराष्ट्रात भाजपमधील बहुजन नेतृत्वाचे पद्धतशीरपणे पंख छाटण्याचे काम केल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. अशास्थितीत विनोद तावडे राष्ट्रीय अध्यक्ष बनलेच तर ते आपल्या विश्वासू नेत्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी सोपवू शकतात आणि फडणवीसांनी २०१९ मध्ये केलेल्या अन्यायाचे पुरेपुर उट्टे काढू शकतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपची झालेली पिछेहाटीचे मोठे कारण त्यांच्या हाती आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात घडणाऱ्या घटना पाहणे महत्वाच्या ठरणार आहेत.