मुंबईः महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी मुंबईच्या बांद्र्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सिद्दिकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळ ४ ते ५ राऊंड फायरिंग केले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ते लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते. आरोपींनी ही हत्या घडवण्यापूर्वी सिद्दिकी यांच्या घराची सुमारे दीड महिना रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत आठच दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे दसरा मेळावे होत असल्यामुळे मुंबई पोलिस हाय अलर्टवर असताना ही हत्या झाली आहे. येत्या काही दिवसांतच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीचे राजकारण आतापासूनच रंगत चालले असतानाच मुंबईत राजकीय नेत्यांची फेब्रुवारीनंतरची तिसरी आणि या आठवड्यातील दुसरी हत्या घडली आहे.
फेब्रुवारीत शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह करून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजता भायखळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मा यांची हत्या करण्यात आली होती. आता आठवडाभरातच बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास बाबा सिद्दिकी हे त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून निघून आपल्या कारमध्ये बसत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. बाबा सिद्दिकी यांना दोन गोळ्या छातीत तर एक गोळी पोटात लागली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पायउतार व्हाः शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते शरद पवार यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवरून सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
जबबादारी स्वीकाराः राहुल गांधी
बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूचे वृत्त धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासह आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे हेच दिसून येत आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि बाबा सिद्दिकी यांना न्याय मिळाला पाहिजे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?: वडेट्टीवार
महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे? महिला सुरक्षित नाही. सामान्य जनता सुरक्षित नाही. इतकेच नाही तर सत्ताधारी पक्षातील आमदार-नेतेसुद्धा सुरक्षित नाहीत. महाराष्ट्राच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे? राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोणाची जबाबदारी आहे? गृहमंत्र्यांनी तातडीने जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावी ही आमची मागणी आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
गृहमंत्र्यांना हाकलाः राऊत
बाबा सिद्दिकींच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. तरीही मारेकऱ्यांनी त्यांना खुलेआम गोळ्या घातल्या. महाराष्ट्राच्या राजधानीत हत्यांचे सत्र सुरु आहे. या घटना आता माजी मंत्री, आमदारांपर्यंत पोहोचल्या आहेत. या राज्यात कोण सुरक्षित आहे? हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे. राज्यात दिवसाढवळ्या खून, खंडणी सत्र सुरु असताना गृहमंत्र्यांच काही जबाबदारी आहे की नाही? महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय आणि अपयशी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची नोंद होईल. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. पण आता गृहमंत्र्यांना हाकला, असे सांगण्याची वेळ आली आहे, असे शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कोण होते बाबा सिद्दिकी?
बाबा सिद्दिकी तीन वेळा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. १९९९ ते २०१४ पर्यंत त्यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी २००४ ते २००८ या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले. तब्बल ४८ वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आक्रमक शैली आणि बॉलीवूडशी घनिष्ठ संबंध असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या इफ्तार पार्टीमध्ये शाहरूख खान, सलमान खान आणि संजय दत्तसारखे अनेक अभिनेते सहभागी होत आले आहेत.