पंकजा मुंडे-मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यात हिशेब करण्याचे, कचका दाखवण्याचे इशारे!


बीडः ओबीसी नेत्या पंकजा मुंडे आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी घेतलेल्या दसरा मेळाव्यात आज हिशेब करण्याची आणि कचका दाखवण्याची भाषा बोलली गेली.  आमच्या लोकांना कुठेही त्रास दिला, वंचित, पीडित, दलित, गरिबांना त्रास दिला तर त्याचा हिशेब केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. तर समाजावर अन्याय झाला तर उठाव करावाच लागेल. आता दाखवतो मी यांना कचका, असे म्हणत मनोज जरांगे-पाटील यांनी आरपारच्या लढाईचे संकेत दिले.

आज बीड जिल्ह्यात दोन दसरा मेळावे झाले. भाजपच्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांचा पारंपरिक दसरा मेळावा भगवान भक्तीगडावर तर मनोज जरांगे-पाटील यांचा पहिलाच दसरा मेळावा नारायण गडावर झाला. या दोन्ही दसरा मेळाव्यांना मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.

‘मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं’ म्हणत पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरूवात केली. तुम्हाला वाटते का माझा पराभव झाल्यामुळे मी थकले आहे. पण सांगते घोडा मैदान लांब नाही. धनंजय मुंडे यांना परळीतून आमदार करणारच आहोत. पण राज्यातील कानाकोपऱ्यात आमच्या लोकांना कुठेही त्रास दिला, वंचित, पीडित, दलित गरिबांना त्रास दिला तर त्याचा हिशेब केल्याशिवाय राहणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी दरवर्षी दसरा मेळाव्याला आल्यानंतर तुम्हाला साष्टांग नमस्कार घालते. मी तुम्हाला साष्टांग नमस्कार का घालते? कारण माझ्या वडिलांनी तुमची जबाबदारी माझ्या झोळीत टाकली आहे. मी विजयी झाल्यावर तुम्ही मला मोठा मान दिला. पण पराभव झाल्यानतंरही तुम्ही मला त्यापेक्षा जास्त मान दिला. आता तुम्हा सर्वांना मान देण्यासाठी मी महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा की नाही?, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. ज्याची पत नाही आणि ऐपत नाही त्यांच्यासाठी मी राजकारणात आहे, असेही मुंडे म्हणाल्या.

या दसरा मेळाव्याला प्रथमच धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. अनेकवेळा संकटाच्या काळात गोपीनाथ मुंडेंपासून पंकजा मुंडेंपर्यंत तुम्ही माझ्या बहिणीच्या पाठीमागे उभे राहिलात. अनेक संघर्षात तुम्ही मेळावा केला. सोबत कोण आहे, बघितले नाही. भाऊ आहे की नाही हे पाहिलं नाही. जरी १२ वर्षे आपलं पटलं नाही, तरी मी वेगळा मेळावा करण्याचा विचार मनात आणला नाही. ज्याला जो वारसा दिला त्याने तो चालवायला पाहिजे. नवीन मेळावा सुरू करून कोणीही या मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही, असा टोला यावेळी धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे-पाटील यांचे नाव न घेता लगावला.

आम्ही क्षत्रीय मराठे, गप्प बसणार नाहीः जरांगे

आमच्यात येऊ नका, आमचे आरक्षण संपत आहे, असे काहींनी म्हटले होते. परवा १५ जाती ओबीसीमध्ये घातल्या तेव्हा तुमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का? आता धक्का लागणारा कुठे आहे? आमच्यात येऊ नका म्हणणारा आता कुठे आहे? असा सवाल मनोज जरांगे-पाटील यांनी केला.

सरकार ओ सरकार.. आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा, जर आमच्या नाकावर टिच्चून तुम्ही आचारसंहिता लागू केली तर तुम्हाला उलथवल्याशिवाय राहणार नाही…आता दाखवतो मी यांना कचका, माझ्यासमोर नाटके करता का? असे जरांगे-पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात एक लाट आली आणि उठाव झाला. मात्र, आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार आहे. त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आपल्या नाकावर टिच्चून जर कुठले निर्णय होणार असतील आणि राज्यातील मराठा समाजावर अन्याय होणार असेल तर आपल्याला या समाजाच्या लेकरांसाठी उठाव करावाच लागेल. आम्ही क्षत्रीय मराठे आहोत, कधीच गप्प बसत नाही, असेही मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!