पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची कोंडी, दोन्ही गटांकडून स्वतंत्र व्हीप जारी!


मुंबईः विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अजित पवारांनी शरद पवारांविरुद्ध बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीचे पडसाद या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड आणि दादा गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दोन स्वतंत्र व्हीप बजावल्यामुळे या आमदारांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार विरोधी बाकावर बसणार की सत्ताधारी? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी २ जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा आहे, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात असला तरी त्यांच्या बाजूने असलेले नेमके आमदार कोणते आणि त्यांचा आकडा किती?  हे अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मात्र हे चित्र स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना व्हीप जारी केला आहे. विरोधी बाकावर बसा, अशी सूचना या व्हीपद्वारे आमदारांना करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादा गटाचे प्रतोद म्हणून अनिल पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते आमदार कुठे बसणार? आणि कोणाला कोणाचा व्हीप लागू होणार? हा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.

वर्षभरापूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्रात असाच वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर आता तोच वाद पुन्हा एकदा पहायला मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांसह मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या ९ आमदारांविरुद्ध शरद पवार गटाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी हे ९ आमदार वगळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्वरित ४४ आमदारांना उद्देशून हा व्हीप जारी केला आहे. त्यामुळे आता या ४४ पैकी किती आमदार विरोधी बाकावर बसतात आणि किती आमदार सत्ताधारी बाकावर बसतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!