परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यानेच मोडला परीक्षेचा नियम; परवानगी न घेता प्रवेश, एकही दिवस हजेरी नसताना दिली एलएलबीची परीक्षा

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नियम आणि कायदे फक्त गरीबबापड्या विद्यार्थ्यांसाठीच असावेत कदाचित. विद्यापीठ कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी या नियम- कायद्यांचे खुलेआम उल्लंघन करतात आणि विद्यापीठ प्रशासन त्यांना मोकाट सोडते, अशीच परिस्थिती सध्या दिसू लागली आहे,. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कार्यरत असलेल्या एका कक्ष अधिकाऱ्याने प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेताच डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये एलएलबीला प्रवेश घेतला. परीक्षेसाठी ७५ टक्के तर सोडाच पण एक दिवसाचीही हजेरी नसताना परीक्षाही दिली. विशेष म्हणजे हा कक्ष अधिकारी परीक्षा काळात रजा न टाकताच विद्यापीठात हजेरी लावून परीक्षेला जात होता. तरीही विद्यापीठ प्रशासनाने या कक्ष अधिकाऱ्याला ना टोकले, ना कोणती कारवाई केली!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात व्यंकटराव साहेबराव खैरनार हे कक्ष अधिकारी पदावर कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या सेवेत ते कायमस्वरुपी आणि पूर्णवेळ कर्मचारी आहेत. एखाद्या शासकीय, निमशासकीय किंवा स्वायत्त आस्थापनेत कार्यरत असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्याला जर नोकरी करत करत शिक्षण घ्यायची इच्छा असेल तर त्याला संबंधित प्रशासनाकडून पूर्वपरवानगी आणि नाहरकत प्रमाणपत्र मिळवणे अनिवार्य आहे.

 परंतु खैरनार यांनी विद्यापीठ प्रशासनाची पूर्वपरवानगी किंवा नाहरकत प्रमाणपत्र न घेताच डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये एलएलबी या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. सध्या ते एलएलबीच्या द्वितीय वर्षाला असून नुकतीच घेण्यात आलेली तृतीय सत्राची परीक्षाही त्यांनी दिली आहे.

एलएलबीला प्रवेश घेण्यापूर्वी खैरनार यांनी विद्यापीठ प्रशासनाची पूर्वपरवानगी किंवा नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही आणि ते संबंधित महाविद्यालयात सादरही केलेले नाही. हा प्रशासकीय शिस्तीचा भंग असल्यामुळे खैरनार यांच्याविरुद्ध आजपर्यंत शिस्तभंगाची कारवाई व्हायला हवी होती, परंतु विद्यापीठ प्रशासनाने त्यांना मोकळीक दिली.

एखाद्या विद्यार्थ्याने कोणत्याही पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला असेल आणि संबंधित सत्रात त्या विद्यार्थ्याची किमान ७५ टक्के हजेरी भरत नसेल तर विद्यापीठाचा परीक्षा विभाग त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारते. तशी कायदेशीर तरतूदच आहे. विद्यापीठाच्या नियम आणि परिनियमात समाविष्ट असलेली ही तरतूदही खैरनार यांनी पायदळी तुडवली आहे.

एकही दिवस हजेरी नाही, तरी परवानगी

एलबीबीला प्रवेश घेतल्यापासून खैरनार हे प्रथम वर्षाची दोन सत्रे, आणि द्वितीय वर्षाचे एक म्हणजेच तृतीय सत्राला एकही दिवस हजर राहिलेले नाहीत. तशी नोंदही डॉ. आंबेडकर लॉ कॉलेज्या दफ्तरी आहे. तरीही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने खैरनार यांचा परीक्षा फॉर्म स्वीकारला. त्यांना हॉल तिकिट जारी केले आणि परीक्षेला बसण्याची परवानगीही दिली.

 परीक्षा विभागातील अधिकारी /कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची सूट असल्याची कोणतीही तरतूद विद्यापीठाचे नियम किंवा परिनियमात नाही. तरीही खैरनार यांना ही सूट परीक्षा विभागाने दिलीच कशी?  खैरनार हे परीक्षा विभागात कक्ष अधिकारी पदावर कार्यरत आहेत, हा काही त्यांना ही सूट देण्याचा निकष असूच शकत नाही.

व्यंकटराव खैरनार यांनी विद्यापीठ प्रशासनाची पूर्वपरवानगी किंवा नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही किंवा संपूर्ण सत्रात एकही दिवस महाविद्यालयाचे तोंड पाहिले नाही.

कर्तव्यावर हजर असताना दिली परीक्षा

खैरनार यांनी केलेला कहर तर अजूनही आहे. एलएलबी तृतीय सत्राची ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२२ ची परीक्षा १७ जानेवारी ते २७ जानेवारी २०२३ दरम्यान घेण्यात आली. दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळात १७ जानेवारी, १९ जानेवारी, २१ जानेवारी, २४ जानेवारी आणि २७ जानेवारी रोजी ही परीक्षा घेण्यात आली. या पाचही दिवशी खैरनार हे विद्यापीठात कर्तव्यावर हजर होते. तशी नोंदही आहे. एकीकडे विद्यापीठात कर्तव्यावर हजर असलेले खैरनार दुसरीकडे या पाच दिवशी २ ते ५ यावेळात परीक्षेलाही हजर होते. त्यांनी तृतीय सत्राच्या पाचही पेपरची परीक्षा दिली. तशी नोंद परीक्षेच्या उपस्थिती पटावर आहे.

‘मिस्टर इंडिया’ स्टाईल करामत

खैरनार यांनी एकाच वेळी दोन ठिकाणी हजर राहण्याची ‘मिस्टर इंडिया’ स्टाइल करामत केली आहे. एकच व्यक्ती एकाच वेळी दोन ठिकाणी कशी काय हजर राहू शकते? असा प्रश्न खैरनारांच्या बाबतीत विचारण्याची सोय नाही. सकाळी हजेरीची नोंद केलेला आपला कक्ष अधिकारी तीन तास कुठे गायब झालाय? असा प्रश्न खैरनार यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनाही पडला नाही. खैरनार यांनी कर्तव्यावर असताना केलेल्या साऱ्याच करामती न्यूजटाऊनच्या हाती आल्या आहेत.

व्यंकटराव खैरनार यांनी एलएलबीच्या द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्राची परीक्षा ज्या पद्धतीने दिली, त्याच पद्धतीने त्यांनी प्रथम वर्षाच्या दोन्ही सत्रांची परीक्षाही दिली, हे उघड आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात तसा तपशीलही उपलब्ध आहे. तरीही त्यांच्या प्रथम वर्षाच्या दोन्ही सत्रांचे निकाल जाहीर करण्यात आले आणि बक्षीस म्हणून त्यांना तृतीय सत्राच्या परीक्षेलाही बेकायदेशीररित्या हजर राहण्याची परवानगी देत हॉलतिकिट जारी करण्यात आले.

परीक्षा विभागातील कक्ष अधिकारी व्यंकटराव खैरनार यांचे परीक्षेचे हॉलतिकिट आणि परीक्षेला हजर असल्याचा पुरावा.

कुलसचिव कारवाई करणार का?

खैरनार यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या सेवाविषयक नियमांचे उल्लंघन तर केलेच शिवाय परीक्षा विभागात कार्यरत असूनही परीक्षाविषयक नियम/परिनियम पायदळी तुडवले आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे कुलसचिव खैरनारांची खातेनिहाय चौकशी लावून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार का? आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक त्यांच्या तिन्ही सत्रांच्या परीक्षेचा निकाल रद्दबातल ठरवणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!