कोल्हापूरः मनधरणी आणि मिन्नतवाऱ्या करूनही बंडखोर उमेदवाराने अखेरपर्यंत माघार घेतली नसल्यामुळे उमेदवारी अर्ज माघार घेण्यास अवघी १० मिनिटे शिल्लक राहिलेली असताना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारानेच निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महायुती विरुद्ध अपक्ष उमेदवार अशीच लढत होणार आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेश लाटकर यांनी अखेरपर्यंत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अवघी १० मिनिटे शिल्लक राहिलेली असताना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात राहिलेला नाही. त्यामुळे आता कोल्हापूर उत्तरमध्ये महायुती विरुद्ध अपक्ष उमेदवार अशीच लढत होणार आहे.
कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने आगोदर राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. लाटकर यांची उमेदवारी जाहीर होताच अनेक माजी नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यांची उमेदवारी बदलावी म्हणून काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर दबावतंत्राचाही वापर करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसने राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांच्याऐवजी मधुरिमा राजे यांना उमेदवारी जाहीर केली.
काँग्रेने आपले तिकिट कापल्यामुळे राजेश लाटकर नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्याचे काँग्रेसकडून अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. कोल्हापूरचे खा. शाहू महाराज, मालोजीराजे हे आज सकाळी राजेश लाटकर यांच्या घरी गेले होते. त्यांनी लाटकरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर ते अर्ज मागे घेतील अशी शक्यता वाटत होती. परंतु सकाळी ८.३० वाजेपासून राजेश लाटकर नॉटरिचेबल झाले. त्यांनी अखेरपर्यंत माघार घेतलीच नाही.
मनधरणी करूनही लाटकरांनी माघार न घेतल्यामुळे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजेश यांनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेताना त्यांच्यासोबत खा. शाहू महाराज आणि मालोजीराजेही होते.
मधुरिमा राजे यांनी माघार घेऊ नये यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न झाले. काँग्रेस नेते सतेज पाटील हे घाईघाईने पोहोचले. परंतु ते पोहोचण्याआधीच मधुरिमा राजे यांनी माघार घेऊन टाकली होती. त्यामुळे सतेज पाटील चांगलेच संतापले होते. लढायचे नव्हते तर आधीच सांगायचे होते. आम्हाला काही अडचण नव्हती. मला तोंडघशी पाडायची काय गरज होती? अशा शब्दांत सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.