मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोलमाफी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय


मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना (एमएलव्ही) संपूर्ण टोलमाफी करण्यात आली आहे. आज रात्रीपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाशी, मुलूंड- एलबीएस, आनंदनगर, ऐरोली आणि दहिसर हे मुंबईत प्रवेश करणारे पाच टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना सध्या ४५ रुपये टोल आकारला जातो. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे या वाहनांना आता यातून सूट मिळाली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा सपाटा लावण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या तीन बैठकांत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातून प्रत्येक घटकाला खूष करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आज होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना जाहीर केली जाण्याचीही शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे महायुतीला फटका बसला होता. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!