
मुंबईः देशभरात नीट पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ जून रोजी घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचाही पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रविवारी २८ जून रोजी होणारी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २८ जून रोजी संपूर्ण राज्यात एकूण १ हजार २८ परीक्षा केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती. नीट-२०२६ परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्या होत्या, असे परीक्षा परिषदेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा होण्याच्या एक दिवस आधीच म्हणजे आज (२७ जून) पहाटेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काही इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची गोपनीय माहिती भिवंडी पोलिसांना मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत त्यांना शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका आढळून आली.
भिवंडी पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेत या प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली असता सदर इसमाकडे २८ जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्यामुळे भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे, असे परीक्षा परिषदेने म्हटले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर २८ जून रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थइतीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी, हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्यामुळए ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
खाऊंगा और खाने को दूंगा…
दरम्यान, या पेपरफुटीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्य सरकार व भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. पेपरफुटीचा सरदार कोण? विद्यार्थ्यांच्या भविष्याचे मारेकरी कोण? भाजपशिवाय दुसरे आहे तरी कोण? असे ट्विट करत प्रदेश काँग्रेसने भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही टीईटी पेपरफुटीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. ‘बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां सुभानअल्ला’ असे ट्विट सपकाळ यांनी केले आहे.
नरेंद्र मोदी+ धर्मेंद्र प्रधान यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचा धमाका, नीटपाठोपाठ शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वपूर्ण टीईटी परीक्षेचाही पेपर लीक! ही परीक्षा देखील पुढे ढकलली. ‘खाऊंगा और खाने को दूंगा, चोरी पकडी गयी तो मैं क्या करू?’ असे खोचक ट्विट सपकाळ यांनी केले आहे.
फोडाफोडीत स्वतःच व्यस्त असणारे पेपरफुटी कशी रोखणार?
टीईटीचा पेपर फुटला म्हणजे हा केवळ एका परीक्षेचा घोटाळा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीची किंमत शून्य करणारी ही व्यवस्था नेमकी कोणाच्या संरक्षणाखाली चालते?, असा सवाल राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला आहे.
प्रत्येकवेळी पेपर फुटतो, चौकशीची घोषणा होते, काही जणांना अटक होते आणि काही दिवसांनी सर्व काही शांत होते. पण विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील गेलेले महिने, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास याची भरपाई कोण करणार? नीट पेपरफुटीचे उदाहरण ताजे असताना टीईटीने पेपर फुटू नये यासाठी योग्य खबरदारी घ्यायला हवी होती. पण कुणाला काही पडले आहे का? जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?, असेही खडसे यांनी म्हटले आहे.
