TET Paper Leak: दीड कोटी रुपयांत विकला जाणार होता टीईटीचा पेपर दिल्लीतून आलेल्या तीन आरोपींना अटक; मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू


ठाणे: देशभरात नीट पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचाही (TET) पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. टीईटी परीक्षेचा फुटलेला पेपर तब्बल दीड कोटी रूपयांत विकला जाणार होता. या पेपरफुटी प्रकरणी दिल्लीहून आलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. तो हाती लागला की या संपूर्ण रॅकेटचा उलगडा होईल, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी भिवंडीत पत्रकार परिषदेत दिली.
नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आला होता. परंतु रविवारी (२८ जून) ही परीक्षा होण्याच्या काही तास आधीच या परीक्षेचा पेपरफुटल्याचे उघडकीस आल्यामुळे महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा हा दावा फोल ठरला आणि उद्या रविवारी होणारी ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की परीक्षा परिषदेवर ओढवली. यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून ४ लाख २८ हजार १२२ उमेदवारांनी नोंदणी केली होती, मात्र पेपरफुटीमुळे टीईटी परीक्षाच रद्द झाल्यामुळे या परीक्षेसाठी अनेक महिन्यांपासून तयारी करणाऱ्या उमेदवारांध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषद घेऊन या पेपरफुटी प्रकरणाची माहिती दिली. उद्या रविवारी टीईटीचा पेपर होणार होता, तो पेपर विक्रीसाठी आणल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिस सतर्क झाले. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जप्त करण्यात आलेली प्रश्नपत्रिका उद्या होणारी प्रश्नपत्रिकाचअसल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले. टीईटीचा पेपर विक्री करण्यासाठी आरोपी दिल्लीवरून आले होते. त्यामध्ये राजीव शहा (वय-४५ वर्षे), आकाश कुमार (वय ३० वर्षे) दोघेही राहणारे बिहारचे असून तिसरा आरोपी धीरज कुमार (वय २८ वर्षे) हा हरियाणाचा रहिवाशी आहे. या तिघांना अटक करण्यात आली असून या प्रकरणातचा मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे, असे दुधे म्हणाले.
दिल्लीवरून महाराष्ट्रात आलेल्या या आरोपींनी टीईटीचा पेपर विकण्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी केली होती. आरोपींकडून जे लोक पेपर विकत घेणार होते, ते पुढे विविध रकमा घेऊन पेपर विकणार होते. पण हा व्यवहार होण्याआधीच पोलिसांनी कारवाई करत आरोपींना जेरबंद केले. पोलिसांच्या झडतीत ४ पेपर सेट, मोबाईल आणि डेबिट कार्ड मिळाले आहे. पोलिसांनी या आरोपींविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१६( ५), ६१ (२) सह महाराष्ट्र परीक्षा अधिनियम २०२४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत, असे दुधे म्हणाले.
टीईटीची प्रश्नपत्रिका कुठून बाहेर पडली?,आरोपींना ती कोणाकडून मिळाली? आणि ती नेमकी कोणाला विकली जाणार होती?, आरोपींचे कोचिंग क्लासेस, परीक्षा एजंट किंवा इतर कोणत्या रॅकेटशी संबंध आहेत का? टीईटीची प्रश्नपत्रिका आणखी कुठे पोहोचली आहे का? ती किती उमेदवारांपर्यंत पोहोचली? या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा सखोल तपास सुरू असल्याचे दुधे म्हणाले.
या पेपरफुटी प्रकरणी २० पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांची विशेष पथके स्थापन करण्यात आली असून तपासासाठी विविध राज्यात पथके रवाना करण्यात आली आहेत. या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. तो हाती लागल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचा उलगडा होईल, असे दुधे म्हणाले. या पेपरफुटी प्रकरणाचे संपूर्ण रॅकेटच उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवल्यामुळे नजीकच्या काळात या प्रकरणातील खळबळजनक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!