फुलंब्रीत सरपंचाने स्वतःचीच कार जाळून केला जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचा निषेध!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंचाने स्वतःचीच कार पेटवून देऊन या लाठीमाराचा निषेध नोंदवला. फुलंब्रीतील पाल फाटा येथे भररस्त्यात हा प्रकार आज घडला.

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शुक्रवारी पोलिसांनी लाठीमार केला. या लाठीमाराच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटायला सुरूवात झाली. गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी शुक्रवारी सकाळी फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा येथे भररस्त्यात स्वताःचीच चारचाकी कार जाळून मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचा निषेध नोंदवला.

स्वतःचीच कार पेटवून दिल्यानंतर सरपंच मंगेश साबळे यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. दुसऱ्या समाजावर अन्याय झाल्यावर सर्वात आधी समोर येणारे आम्ही, आमच्या आईबहिणीवर अत्याचार झाल्यावर शांत बसणार नाही. आमच्या आईबहिणींच्या डोक्यात तुम्ही काठ्या टाकल्या, त्यांना रक्तबंबाळ केले. याचसाठी अट्टाहास केला होता का स्वराज्याचा? याचसाठी का ४० दिवस यातना सहन केल्या माझ्या शंभूराजाने? हात मोडले, पाय तोडले, डोळे काढले, कान कापले, गर्दन छाटले, याचसाठी अट्टाहास केला होता का? असा सवाल मंगेश साबळे यांनी या व्हिडीओत विचारला आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात अंबड आणि गेवराई तालुक्यातील १२३ गावांनी मंगळवारी आंदोलन केले होते. परंतु या आंदोलनानंतरही राज्य सरकारने ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे जरांगे यांनी आंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी शेकडो लोकांनी आंतरवली येथे गर्दी केली होती.

 आंतरवली गावात वाढलेली गर्दी आणि आंदोलकांच्या प्रकृतीची स्थिती लक्षात घेता त्यांच्याशी चर्चा करून पोलिसांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र आंदोलकांनी नकार दिल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. या लाठीमारात अनेक आंदोलक जबर जखमी झाले आहेत. या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटालया सुरूवात झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!