पुरोगामी महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर ‘दैवतीकरण’, प्रजासत्ताक दिन संचलनात  साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ


मुंबई:  फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची पुरोगीमी ओळख आता इतिहासजमा होणार का? असा प्रश्न उपस्थित व्हावा त्या दिशेने महाराष्ट्र सरकारची वाटचाल सुरू आहे. केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पुरोगामी राज्य अशी ओळख असलेला महाराष्ट्र येत्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांचा चित्ररथ सामील करणार आहे. हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर होणारे दैवतीकरण तर नाही ना?  असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या प्रेसनोट नुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे  आणि स्त्रीशक्ती जागर’ चित्ररथावर साकारण्याचे काम दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरु आहे.

यावर्षीच्या चित्ररथ संकल्पनेत ‘साडेतीन शक्तिपीठे  आणि स्त्रीशक्ती जागर’ यांची निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते. पथसंचलनात सहभागी होणारे राज्य आणि मंत्रालये आपापल्या परीने उत्तमोत्तम संकल्पना निवडतात आणि कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देऊन, हुबेहूब साकारून पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात.

यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे व स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन यावेळी सर्व देशवासियांना घरबसल्या होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा चित्ररथ साकारण्यासाठी मूर्तिकार आणि कलाकारांना संधी दिली आहे. यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत ‘शुभ एड’ चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळत आहेत. ३० जणांचा समावेश असलेल्या, युवक मूर्तिकार आणि कलाकारांच्या टीमला घेऊन राहुल धनसरे मेहनत घेऊन २६ जानेवारीपर्यंत महाराष्ट्राचा चित्ररथ परिपूर्ण करण्याचे काम करत आहेत.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे व सहकारी यांच्या सहकार्याने हा चित्ररथ पूर्णत्वास येत आहे.

 आजपर्यंत प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोककला आणि पुरोगामीत्वाचेच देखावे दाखवण्यात आले आहेत. आगामी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणारा साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ हे पुरोगामी महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवरचे अधिकृत दैवतीकरण तर ठरणार नाही ना?, अशी शंका घेतली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!