‘घरबसल्या दररोज ३००० ते २०,००० रुपये कमवा,’ तुम्हालाही येत आहेत का अशाप्रकारचे मेसेज? अडकण्याआधी जाणून घ्या वस्तुस्थिती


नवी दिल्लीः  ‘घर बसल्या दररोज १० हजार रुपये कमवा, २० हजार रुपये कमवा’ किंवा ‘घर बसल्या पार्टटाइम जॉब करा’ अशा ऑफर्स देणारे वर्क फ्रॉम होमचे मेसेज तुम्हाला वारंवार येत आहेत का?  तुमचे उत्तर जर हो असेल तर सावध व्हा!

मागील काही वर्षांपासून असंख्य लोक अशा फसवणुकीला बळी पडले आहेत. सध्या केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या प्रकरणाची चौकशी करत आहे.

अनेक व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून काम करणारे भारत आणि परदेशात बसलेले घोटाळेबाज कथितरित्या लोकांना रोजगाराची खोटी आश्वासने देतात आणि विविध मार्गाने त्यांच्याकडून पैसे उकळतात. या माध्यमातून कमवलेला पैसा कथितरित्या शैल कंपन्यांच्या माध्यमातून पाठवला जातो आणि हा काळा पैसा व्हाइट केला जातो.

हा भारतातील सर्वात मोठ्या ‘सायबरपुरस्कृत मनी लाँडरिंग घोटाळ्यापैकी’ एक घोटाळा असल्याचे सीबीआयचे मत आहे. या आठवड्यात सीबीआयने ‘ऑपरेशन चक्र-२’ या विशेष मोहिमेअंतर्गत भारतभरात विविध ठिकाणी छापेमारी केली. संघटित सायबरसक्षम आर्थिक गुन्हेगारीचा शोध घेऊन ती नष्ट करण्याच्या उद्देशाने ‘ऑपरेशन चक्र-२’ ही विशेष मोहीम आखण्यात आली आहे.

निरपराध लोकांना गुंतवणूक आणि पार्टटाइम नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याची माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने या घोटाळ्याच्या बाबतीत मागीलवर्षी एक एफआयआर दाखल केला होता. सीबीआय जशी या घोटाळ्याच्या खोलात गेली, तेव्हा या घोटाळ्याचे अनेक पैलू आणि प्रगत तंत्रज्ञान वापरून ऑपरेट केल्या जाणाऱ्या एका जटील रॅकेटचा पर्दाफाश केला गेला.

या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे. या घोटाळेबाजांनी विविध व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून संपर्क साधून शेकडो भोळ्याभाबड्या लोकांची फसवणूक केली आहे. शिवाय गुंतवणूक आणि पार्टटाइम नोकरीच्या नावाखाली या घोटाळेबाजांनी पीडितांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यासाठी विविध बँक खाती आणि यूपीआयचा वापर केला आहे, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

लोकांची फसवणूक करून उकळलेला हा व्हाइट करण्यासाठी विविध शेल कंपन्यांची वेगवेगळी बँक खाती आणि परदेशातील क्रिप्टो वॅलेटमधील पैसे काढण्याच्या सुविधेचा वापर करण्यात आला आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे, असेही सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

या घोटाळ्याशी संबंधित असलेल्या बहुतांश शेल कंपन्यांची ‘चीनी लिंक’ही समोर आली आहे. सीबीआयकडून त्याबाबतही तपास केला जात आहे.

सायबर घोटाळेबाज या फसवणुकीसाठी गुगल ऍड्स, बल्क एसएमएस, सिम बॉक्सआधारित एसएमएस, क्लाउड सेवा, फिनटेक कंपन्या आणि एपीआयचा वापर करतात, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.

सीबीआयने दोन प्रकरणांच्या संदर्भात ७२ ठिकाणी छापेमारी केली. ज्यात ऍमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टचा ‘टेक्निकल असिस्टंट एक्झिकेटिव्ह’ असल्याची बतावणी करून परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचाही संबंध होता.

चिनी लिंक असलेल्या कंपन्यांशी संबंधित ‘क्रिप्टोकरन्सी’ घोटाळ्याशी संबंधित तीन अन्य प्रकरणातही सीबीआयने सर्च ऑपरेशन केले.

ऑपरेशन चक्र ही मोहीम अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या सहकार्याने राबवले जात असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

एक आकर्षक मेसेज + एक लिंक = फसवणूक

 ही फसवणूक कशी केली जाते? सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी पीडितांना गुगल, फेसबुक जाहिराती, टेलिग्राम ऍप आणि एसएमएसच्या माध्यमातून संपर्क केला जातो. त्या मेसेजमध्ये झटपट पैसे कमवण्यासाठी नोकरीच्या संधीचे मेसेज पाठवले जातात.

लोकांना पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये ‘डियर सर, अमेझॉन तत्काळ पार्टटाइम जॉबसाठी भरती करत आहे. तुम्ही दररोज ३००० ते १०,००० रुपये कमवू शकता. मी एक एचआर मॅनेजर आहे. तुमची पार्टटाइम/फुलटाइम जॉबसाठी निवड करण्यात आली आहे. आता तुम्ही दरदिवशी २०,००० रुपयांपर्यंत कमवू शकता. लिंकवर क्लिक करून अर्ज करा.’ असे लिहिलेले असते.

अशा प्रत्येक मेसेजमध्ये एक व्हॉट्सअप लिंक असते. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर थेट चॅटिंगचे संकेत मिळतात.

चॅटमध्ये असलेली व्यक्ती पीडित व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू करतो आणि शेवटी एका गुंतवणूक वेबसाइटची लिंक पाठवतो.

अन्य एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चॅटमध्ये हजर असलेली व्यक्ती पीडिताला सांगते की तुम्हाला काही गुंतवणूक करावी लागेल आणि तुम्हाला झटपट चांगले रिटर्न्स मिळतील.

काही प्रकरणात पीडिताला दस्तावेज किंवा ईमेल टाइप करण्यासारखी कामेही दिली जातात. परंतु कोणतेही काम करण्यासाठी एक अनिवार्य अट ही असते की, आधी तुम्ही तुमची ऐपत सिद्ध करण्यासाठी तुम्हाला यूपीआय वॅलेटमध्ये पैसे लोड करावे लागतील.

हे पैसे टाकण्यासाठी वेबसाइटवर अनेक पेमेंट गेटवे उपलब्ध करून दिले गेले आहेत, ते सर्वच्या सर्व अनधिकृत आहेत.

त्यातील काही पेमेंट गेटवे भारतात संचलित करण्यासाठी अनधिकृत नाहीत. हे सर्व व्यवहार इंटरनेट लिंकचा वापर करून यूपीआयच्या माध्यमातून केले जातात.

पैसे जमा करण्यासाठी (आयसीआयसीआय बँक/ रोझर पे/ भारतपे इत्यादी) यूपीआयच्या माध्यमाचा वापर केला जातो आणि पैसा दुप्पट करण्याचे किंवा प्रचंड मोठे कमिशन देण्याचे आमिष दिले जाते.

पहिल्या टप्प्यातील बँक खात्यातून अन्य बँक खात्यात पैसा स्थानांतरित केला जातो. मग एका मध्यवर्ती खात्यातून हा पैसा क्रिप्टो करन्सी, बुलियन, पेआऊड खात्यांसारख्या अनेक स्रोतांमध्ये विभाजित केला जातो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फसवणुकीमध्ये सहभागी असलेल्या बहुतांश वेबसाइट्स ‘xyz’ किंवा ‘wixsite’  या डोमेनवर नोंदणीकृत आहेत. शिवाय व्हॉट्सअप, टेलिग्राम अथवा अन्य प्लॅटफार्मच्या माध्यमातून लिंकवर मेसेज पाठवण्यासाठी ज्या मोबाइल नंबरचा वापर करण्यात येतो, ते वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत.

व्हॉट्सअपवर सक्रीय असलेले काही भारतीय मोबाइल नंबर सिम कार्ड मालकाच्या माहितीशिवाय चालवण्यात येत आहेत. त्यामुळे या जाळ्यापासून सावधानी बाळगण्याची  गरज आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!