भगतसिंह कोश्यारींना नारळ, पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?


नवी दिल्लीः राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन आयुष्यातील उर्वरित वेळ चिंतन, ममन करण्यात व्यतीत करण्याची इच्छा बाळगून असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लवकरच नारळ मिळू शकते आणि त्यांच्या जागी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांची नियुक्ती केली जाऊ शकते, असे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे.

भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त आणि चर्चित राज्यपाल ठरले आहेत. महापुरूषांवर त्यांनी अनेकदा केलेली आक्षेपार्ह आणि अपमानास्पद व्यक्तव्ये यामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. परिणामी महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून त्यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी राज्यात अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. एखाद्या राज्यपालांविरोधात महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच आंदोलने झाली नाहीत. सप्टेंबर २०१९ पासून कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले असता राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांच्याकडे ‘राजकीय जबाबदाऱ्यांतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आयुष्यातील उर्वरित वेळ चिंतन, मनन करण्यात घालवण्याची इच्छा आहे,’ असेही त्यांनी प्रधानमंत्र्यांकडे बोलून दाखवले होते.

राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात महाराष्ट्रात उमटलेले विरोधाचे सूर आणि त्यांनी स्वतःहोऊनच व्यक्त केलेली राजकीय जबाबदाऱ्यांतून मुक्त होण्याची इच्छा यामुळे केंद्र सरकारकडून त्यांना नारळ देऊन त्यांच्या जागी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी वर्णी लावली जाऊ शकते, असे ‘इंडियन एक्सप्रेस’च्या या वृत्तात म्हटले आहे. असे असले तरी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कोण आहेत अमरिंदरसिंग?: अमरिंदरसिंग हे एकेकाळचे पंजाबमधील काँग्रेसचे वजनदार नेते होते. ते पंजाबचे मुख्यमंत्रीही होते. मार्च २०२२ मध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले. त्यामुळे नाराज झालेल्या अमरिंदरसिंग यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पंजाब लोक काँग्रेस नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. या पक्षाला पंजाबमध्ये फारसे लोकसमर्थन मिळत नसल्याचे पाहून त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करुन टाकला आहे. आता ते भाजपचे नेते आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!