नवी दिल्लीः काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाहेरील व्यक्तीची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक देशभर चर्चेचा विषय बनली होती. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात मल्लिकार्जुन खारगे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे.
या निवडणुकीत मल्लिकार्जुन खारगे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उभे असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांना १ हजार ७२ मते मिळाली आहेत. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शशी थरूर यांनी ट्विट करून मल्लिकार्जुन खारगे यांचे आभार मानले आहेत.
विशेष म्हणजे या निवडणुकीत ४१६ मते बाद झाली आहेत. सोमवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. सरासरी ९६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खारगे यांचे अभिनंदन केले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेल्या २४ वर्षांनंतर प्रथमच गांधी कुटुंबाहेरील व्यक्तीची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात केवळ सहा वेळाच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली आहे. यापूर्वी १९३९, १९५९,१९७७ आणि २००० मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. यंदा झालेली ही सहावीच निवडणूक आहे.