बारामतीत रंगणार नणंदविरुद्ध भावजय सामना, खा. सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात?


मुंबई/बारामतीः अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी पडल्यानंतर राष्ट्रवादीचे पक्षांतर्गंत आणि पवार कुटुंबांतर्गत राजकारणाची समीकरणेही बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सुप्रिया सुळे खासदार असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असून त्यामुळे बारामती या हाय व्होल्टेज लोकसभा मतदारसंघात यावेळी भावजय विरुद्ध नणंद सामना बघायला मिळणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

अजित पवारांच्या नेतृत्वात शरद पवारांविरुद्ध बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या नेतृत्वातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. या बंडानंतर खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचा दावा अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाला देणार याचा निवाडा अद्याप होणे बाकी आहे.

अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दिलजमाईची शक्यता आता जवळपास धुसर झालेली असल्याचे मानले जात असतानाच आता शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे प्रतिनिधित्व करत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

बारामतीतून सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी या निर्णयाचे स्वागतच केले. आपण लोकशाही मानतो. त्यामुळे कुणी ना कुणी माझ्या विरोधात लढणारच आहे. त्यामुळे अशा निर्णयांचे पूर्ण ताकदीने स्वागत केले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘माझे म्ङणणे आहे की आमच्याकडे तरी लोकशाही आहे. दिल्लीत काय दडपशाही सुरू असते, हे संपूर्ण देश पहातो आहे. पण आमच्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे मला वाटते की, कुणीतरी माझ्या विरोधात लढणारच आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा मानसन्मान केला पाहिजे,’ असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भाजपने माझ्याविरोधात तीन वेळा निवडणूक लढवली. यावेळीही कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. मी लोकशाहीचे मनापासून स्वागत करते. ही लोकशाही जगली पाहिजे, टिकली पाहिजे. आपण अशा सर्व निर्णयांचे पूर्ण ताकदीने स्वागत केलेच पाहिजे. कणीतरी विरोधात लढलेच पाहिजे, असेही खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया पाहता त्यांनीही या सामन्याची मानसिक तयारी केल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात भावजयविरुद्ध नणंद असा सामना पहायला मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसे झालेच तर आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील हा सर्वात हाय व्होल्टेज आणि रंजक सामना ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!