उर्फी जावेदवरून चित्रा वाघ- चाकणकर आमने-सामने, महिला आयोगाने बजावली नोटीस; वाघ म्हणाल्या अशा ५६ नोटिशीत…


मुंबईः अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यावरून ‘महाराष्ट्रात असा नंगानाच चालू देणार नाही,’ असा इशारा देत तिच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ आता महिला आयोगाच्या निशाण्यावर आल्या आहेत. तेजस्वीनी पंडितला नोटीस पाठवणारा महिला आयोग उर्फी जावेदला मात्र जाणीवपूर्वक नोटीस पाठवत नसल्याचा आरोप केल्यामुळे महिला आयोगाने चित्रा वाघांना नोटीस पाठवली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली. त्यामुळे उर्फी जावेद प्रकरणावरून एकेकाळच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन ‘सख्ख्या मैत्रिणी’ आमने-सामने आल्या आहेत.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच रंगला आहे. अंगप्रदर्शन आणि धुम्रपानाचे समर्थन होत असल्यामुळ ट्विटरवर आलेल्या बातमीची दखल घेऊन अभिनेत्री तेजस्वीनी पंडित आणि वेबसिरीजच्या दिग्दर्शकाला महिला आयोगाने नोटीस पाठवली होती. उर्फी जावेदला मात्र महिला आयोग जाणीवपूर्वक नोटीस पाठवत नाही. उर्फीबरोबरच महिला आयोग बेफाम झाला आहे काय? असा आरोप चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

 एखादी महिला मुंबईत उघडी-नागडी फिरत आहे. समाजमाध्यमात अश्लील, घाणेरडे व्हिडीओ व्हायरल होत असताना महिला आयोगाने सुमोटो दखल घेऊन कारवाई का केली नाही? यासाठी महिला आयोगाला वेळ नसेल तर मग त्या पदावर बसण्याचा कोणाला अधिकार नाही, असे टिकास्त्रही चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव न घेता सोडले होते.

 चित्रा वाघ यांच्या या आरोपांची दखल आज राज्य महिला आयोगाने घेतली. काल चित्रा वाघ यांनी माध्यमांना खोटी माहिती दिली. अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरून राज्य महिला आयोगाने तेजस्विनी पंडितला कोणतीही नोटीस पाठवली नाही. आम्ही वेबसिरीजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. आम्हाला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ही नोटीस बजावण्यात आली होती आणि दिग्दर्शक म्हणून तुमची भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश या नोटिसीद्वारे देण्यात आले होते. त्यावर संजय जाधव यांनी आयोगाकडे उत्तर दिले. यादरम्यान कुठेही तेजस्विनी पंडितचा उल्लेख नव्हता, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या.

स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगावर खोटे आरोपः महिला आयोग गेल्या ३० वर्षांपासून काम करत आहे. आयोगाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा मोठी आहे. अनेक कर्तृत्ववान महिलांनी आयोगासाठी काम केले आहे. त्यामुळे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अशाप्रकारे खोटे आरोप करणाऱ्या चित्रा वाघ यांना महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. चित्रा वाघ यांनी या प्रकरणी दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा महिला आयोग कारवाई करेल, असेही चाकणकर म्हणाल्या.

स्वतःच्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगावर आरोप केले. संजय राठोड प्रकरणातील मास्टर माईंड शोधून काढू म्हणणाऱ्या चित्राताई तोंडावर पडल्यानंतर त्या उर्फीकडे वळाल्या पण उर्फीने त्यांना दाद दिली नाही. आता त्या महिला आयोगावर टीका करत आहेत.”

रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा

 भारतीय संविधानाने प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे उर्फी जावेदचे समर्थन कोण करते आहे आणि कोण नाही? याबाबत बोलण्याचा चित्रा वाघ यांना अधिकार नाही. त्यांनी नको त्या ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा महत्वाच्या मुद्द्यांवर बोलले पाहिजे. महाराष्ट्रात दररोज ३४ मुली मिसिंग झाल्याच्या तक्रारी येतात. त्यावर चित्रा वाघ यांनी बोलले पाहिजे. ओमानमधील महिलांचा विषय आहे. ओमानमध्ये पुण्यातील अनेक महिला अडकल्या आहेत. हा मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीने महिला आयोग काम करत आहे, असेही चाकणकर म्हणाल्या.

चित्रा वाघ म्हणाल्या ५६ नोटिशीत आणखी एक भरः दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या नोटिशीवर चित्रा वाघ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटिशीचा तर मला येणाऱ्या अशा ५६ नोटिशीत आणखी एकाची भर…! जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये, तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही, अशी भूमिका घेणारीला पाठवली… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहाणार, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

नोटिशीला उत्तर देणार की नाही?: चित्रा वाघ यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी राज्य महिला आयोगाने पाठवलेल्या नोटिशीला त्या दोन दिवसांत उत्तर देणार की नाही? हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे उर्फी जावेद प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकेकाळच्या दोन ‘सख्ख्या मैत्रिणीं’मध्ये तापलेले हे वातावरण नेमके कोणत्या वळणावर जाते, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!