कर्नाटकमध्ये काँग्रेसची मुसंडी, भाजपचे आठ मंत्री पिछाडीवर; मुख्यमंत्री बोम्मईंच्या बालेकिल्ल्यातही भाजपला खिंडार


बेंगळुरूः कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून मतमोजणीच्या प्रारंभिक कलात काँग्रेसने प्रचंड मोठी मुसंडी मारल्याचे चित्र दिसू लागले असून भाजपचे तब्बल आठ मंत्री पिछाडीवर आहेत. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांच्या बालेकिल्ल्यातच भाजप पिछाडीवर आहे. त्यामुळे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसच्या हाती कर्नाटकची सत्ता पुन्हा येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सुरूवातीचे कल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंगळुरूत जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे. पक्षाचे झेंडे हातात घेऊन काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.

आतापर्यंत हाती आलेल्या प्रारंभिक कलानुसार कर्नाटकमध्ये काँग्रेसचे उमेदवार ११७ मतदारसंघात आघाडीवर आहेत. भाजप केवळ ७८ मतदारसंघात आघाडीवर असून जेडीएस २६ जागांवर तर ५ जागांवर अन्य उमेदवार आघाडीवर आहेत. दोन तासांच्या मतमोजणीनंतरचे हे कल आहेत.

कर्नाटकमध्ये आम्ही प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहोत, यात आता कोणतीही शंका नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नकारात्मक प्रचाराचा मतदारांवर कोणताही परिणाम झालेला नाही, हे मतमोजणीच्या कलावरून स्पष्ट झाले आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना आजच बेंगळुरूला पोहोचण्यास सांगितले आहे.

हे प्रारंभिक कल काँग्रेसच्या बाजूने दिसत असतानाही भाजपने अद्याप बहुमताची अपेक्षा सोडलेली नाही. आता भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर दिसत अशली तरी बहुमत आम्हालाच मिळेल आणि आम्हीच सरकार स्थापन करू, असे भाजप प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम यांनी म्हटले आहे.

भाजप नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई हे शिग्गाव मतदारसंघातून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार यासिर अहमद खान पठाण पिछाडीवर आहेत.

बेळगावमधील ३ मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. निपाणी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळताना दिसत असून या पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील आघाडीवर आहेत. भाजपच्या उमेदवार शशीकला जोल्ले पिछाडीवर असून त्यांना मतदारांनी मोठा धक्का दिला आहे.

कर्नाटक निवडणुकीचे निकाल हा नरेंद्र मोदींचा पराभव असून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी पराभव स्वीकारला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!