प्रा. विलास भवरे यांना ‘धम्मभूषण’ पुरस्कार

पुसदः आंबेकरी चळवळीतील सक्रीय कवि, रंगकर्मी आणि पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक विलास भवरे यांना धम्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा. विलास भवरे यांनी धम्म चळवळीत दिलेल्या योगदानाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळीत दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

धम्म चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या उपासकांच्या कार्याच्या गौरवार्थ अमरावतीच्या महाबोधी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील वटफळी वटफळा येथे येत्या ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ३१ व्या बौद्ध धम्म परिषदेत कपिलवस्तु येथील जागतिक किर्तीचे भदन्त धम्मप्रिय महाथेरो यांच्या हस्ते प्रा. विलास भवरे यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिक्खू संघाचे सचिव प्रा. भदन्त सुमेधबोधी हे राहणार आहेत. भदन्त नागघोष, भदन्त धम्मदीप, भदन्त डॉ. हर्षबोधी व भिक्खू संघाची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे, असे प्रा. भदन्त सुमेधबोधी महाथेरो यांनी कळवले आहे.

 प्रा. विलास भवरे हे ज्येष्ठ आंबेडकरी कवी असून ते रंगकर्मीही आहेत. ‘आयुष्य नांगरताना’ या एकपात्री नाटकाचे त्यांनी विविध ठिकाणी प्रयोग केले आहेत. विदर्भातील आंबेडकरी साहित्य विश्वास सक्रीय असलेले प्रा. विलास भवरे यांनी विदर्भातील विविध आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या आयोजनातही महत्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!